गॅस सिलिंडरच्या स्फोटात चार घरे संपूर्ण खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 01:41 AM2019-03-17T01:41:06+5:302019-03-17T01:41:23+5:30

दात्याणे येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने घरात एकही व्यक्ती नसल्याने जीवितहानी टळली.

Gas cylinders exploded in four houses | गॅस सिलिंडरच्या स्फोटात चार घरे संपूर्ण खाक

गॅस सिलिंडरच्या स्फोटात चार घरे संपूर्ण खाक

Next
ठळक मुद्देदात्याणेतील घटना; संसारोपयोगी वस्तूंसह रोख रक्कम भस्मसात

कसबे सुकेणे : येथून जवळच असलेल्या दात्याणे येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने घरात एकही व्यक्ती नसल्याने जीवितहानी टळली.
ओझर-सुकेणे रस्त्यावरील दात्याणे येथील महादेवनगर परिसरात राहणाऱ्या शेतमजुरांच्या घरांना सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागली. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने घरातील स्त्री व पुरुष शेतात मजुरी करण्यासाठी सकाळी लवकरच बाहेर पडले होते. लहान मुलेही शाळेत गेली असल्याने घरात कोणीही नव्हते. सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरेश निवृत्ती हिलम यांच्या राहत्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. मोठ्या आवाजाने परिसर हादरून गेला. काय झाले हे समजण्याच्या आत सुरेश हिलम यांच्या घराशेजारी असणाऱ्या संदीप निवृत्ती हिलम, विठ्ठल निवृत्ती हिलम, भगवान खंडू पवार यांच्या घरांनीही पेट घेतल्याने घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूसह रोख रक्कम, दागिने, धान्य व इतर किमती ऐवज जळून खाक झाला. पिंपळगाव ग्रामपंचायत व एचएएल कंपनीच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली; पण तोपर्यंत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या. घटनास्थळी ओझरचे पोलीस निरीक्षक मथुरे, ओझरचे मंडल अधिकारी प्रशांत तांबे, तालठी कल्पना पवार, पोलीसपाटील रमेश टोगरे, ग्रामसेवक दिधळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. घटनेचे वृत्त समजताच माजी आमदार दिलीप बनकर, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक निवृत्ती धनवटे, सरपंच भूषण धनवटे यांनी घटनास्थळी भेट दिली. ओणे येथील शरद हाळदे यांनी आपल्या स्वखर्चाने या चारही कुटुंबांना भांड्यांचे वाटप केले.
पैसे, दागिने, कागदपत्रांसह सर्व संसार जळून खाक झाल्याने हिलम व पवार परिवारास अश्रू अनावर झाले होते. परिसरातील शेतकरी व युवकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Gas cylinders exploded in four houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.