शहीद गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:32 AM2018-11-13T01:32:18+5:302018-11-13T01:33:16+5:30

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झाले.

 Funeral on Shaheed Gosavi | शहीद गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार

शहीद गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार

Next

सिन्नर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झाले. सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथे सोमवारी सायंकाळी शहीद केशव गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार  करण्यात आले. यावेळी अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या  हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले. 
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी येथील गरीब कुटुंबातील केशव सोमगीर गोसावी हे सुमारे नऊ वर्षापूर्वी सैन्यदलात भरती झाले होते. कोल्हापूर, गया व काश्मिर येथे सेवा बजावल्यानंतर सध्या ते जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये कार्यरत होते. मराठा लाइट इन्फन्ट्रीची तुकडी सीमेवर गस्त घालत असतांना शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पाकच्या बाजूने स्नायपरचा हल्ला झाला. या हल्ल्यात केशव जखमी झाले होते. उपचारादरम्यान ते शहीद झाले.
केशव यांना वीरमरण आल्याची वार्ता सिन्नर तालुक्यात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आली. या दु:खद बातमीमुळे सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली. शिंदेवाडी ग्रामस्थांनी सकाळपासून स्वयंस्फूर्तीने बंद पाळून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.
विशेष शासकीय विमानाने केशव यांचे पार्थिव ओझर विमानतळावर सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास आणण्यात आले. ओझर विमानतळावर लष्करी अधिकारी, महसूल व विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी आदरांजली अर्पण केली. ओझर विमानतळावरुन लष्करी वाहनाद्वारे शहीद केशव यांचे पार्थिव सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी येथे आणण्यात आले. केशव यांचे पार्थिव घरी येताच कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.
सजविलेल्या रथातून केशव यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, केशव गोसावी अमर रहे ! या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महिलांनी अंत्ययात्रेच्या मार्गावर सडासंमार्जन करुन रांगोळ्या काढल्या होत्या. स्मशानभूमी परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. हजारो नागरिक शोकसागरात बुडाल्याचे दिसून येत होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शहीद केशव यांचा दफनविधी करण्यात आला. लष्कर व पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली.
अंत्यसंस्कार प्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, प्रांत महेश पाटील, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, तहसीलदार नितीन गवळी, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, राहुल आहेर, जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, सहाय्यक निरीक्षक मोतीलाल वसावे, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी शहीद जवान केशव यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले.
 दिवसभर केशवची प्रतीक्षा
रविवारी रात्री केशव गोसावी यांना वीरमरण आल्याची वार्ता शिंदेवाडी येथे पोहचली होती. गोसावी कुटूंबीय, नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थांच्या नजरा केशव यांचे पार्थिव शिंदेवाडी गावात येण्याकडे लागून राहिल्या होत्या. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून हल्ल्याचा निषेध केला होता. दिवसभर अंत्यविधी परिसरात साफसफाई मोहीम राबविण्यात आली व अंत्यविधीला येणाºया हजारो नागरिकांना बसण्याची व पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.

 

Web Title:  Funeral on Shaheed Gosavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.