Fund sanction for Malegaon development works | मालेगावातील विकास कामांसाठी निधी मंजूर
मालेगावातील विकास कामांसाठी निधी मंजूर

मालेगाव : महापालिका क्षेत्रासह हद्दवाढीतील भागात मुलभूत सोयसुविधांच्या कामांसाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या फेब्रुवारी अखेर विकास कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील महापालिकांना मुलभूत सोयसुविधांच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ५ कोटी रूपयांच्या निधीला ८ जानेवारी २०१९ रोजी नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. या निधीतून गिरणा नदीवरील पूल, रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरण, कॉलनी अंतर्गत रस्ते, कलेक्टरपट्टा भागातील भूमिगत गटारी, स्मशानभूमी दुरुस्ती आदिंसह इतर कामे केली जाणार आहेत तर हद्दवाढ भागातील सोयसुविधांसाठी राज्य शासनाने १४.५५ कोटींच्या प्रस्तावाला यापूर्वी मंजुरी दिली आहे. त्याचा पहिला हप्ता ५.८२ कोटी वितरीत करण्यात आला आहे. या निधीतून शिल्लक राहिलेल्या ३ कोटीच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून हद्दवाढ भागातील कलेक्टरपट्टा भागात गटार बांधकाम, सोयगाव - जयरामनगर ते दौलती शाळापर्यंत शिवरोड रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण, रमजानपुरा भागात सभा मंडप, सायने बु।।ला शौचालय, जॉगिंग ट्रॅक, बैठक व्यवस्था, तलाव सुशोभिकरण, सोयगाव व भायगाव येथे सामाजिक सभागृह, म्हाळदे येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण, सोयगाव भागातील रस्ते आदिंसह इतर कामे केली जाणार आहे.
फेब्रुवारी अखेरपर्यंत या कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव, नगरसेवक निलेश आहेर, राजाराम जाधव, महानगर प्रमुख रामा मिस्तरी, भरत देवरे, मनोहर बच्छाव आदि उपस्थित होते.


Web Title: Fund sanction for Malegaon development works
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.