लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बेपत्ता झालेल्या चार ते पाच वयोगटातील चार मुली १८ जून रोजी अकोटात आढळून आल्या. शहर पोलिसांनी राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये या चारही मुली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सदर अल्पवयीन मुली या अकोटात आल्या कशा, या महिलेच्या घरी त्या राहिल्या कशा, याबाबत पोलिसांनी तपास करणे गरजेचे झाले.
अकोट शहर पोलिसांनी शहरातील काही भागात शोधमोहीम राबविली. यावेळी अमिनपुरा या ठिकाणी बाहेरगावावरील चार ते पाच अल्पवयीन मुली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून रशिदाबी यांच्या घरी पोलिसांनी चौकशी केली असता यावेळी जयनाबी तहरीन आसीफ (१२), कुलसुम तहरीन आसीफ (९), मयीम तहरीन आसीफ (५) व मिसबा अजीम खान (८) या आढळून आल्या. त्यांची अधिक चौकशी केली असता त्या मालेगाव येथून आल्या असल्याचे समजले. मालेगाव येथून काही मुलीसुद्धा बेपत्ता झाल्या असल्याची माहिती अकोट पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे शहानिशा करण्याकरिता अकोट शहर पोलिसांनी मालेगाव पोलिसांशी संपर्क साधला त्या बेपत्ता असल्याची नोंद असल्याचे समोर आले. मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, पोलीस निरीक्षक सी.टी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, जितेंद्र कातखेडे, अमरदीप गुरू, वीरेंद्र लाड, दीपाली देशमुख यांनी केली. याबाबत मालेगाव पोलिसांचे पथक मुलींना ताब्यात घेण्याकरिता येत असल्याचे ठाणोदार सी.टी. इंगळे यांनी सांगितले.