ठळक मुद्देदुपारी तीन वाजेपर्यंत द्वारका चौकात ठिय्या आंदोलनबंदला नाशिकमध्ये पाठिंबा

नाशिक : आंबेडकरी संघटनांनी भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभरात पुकारलेल्या बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरात बंद शांततेत यशस्वी झाला. दलित बांधवांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत व रास्ता रोकच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला. नाशिककरांनीदेखील बंदच्या हाकेला ओ देत आपापले व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले.


पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (दि.१) झालेल्या हाणामारीच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी राज्यभर बंद पुकारला. या बंदला नाशिकमध्ये पाठिंबा मिळाला. बंद शांततेच्या मार्गाने यशस्वी झाला. शहरातील विविध उपनगरे व जिल्ह्यामधील काही गावांमध्ये घडलेल्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता दखलपात्र अनुचित घटना कुठेही घडल्याची नोंद प्रशासनाकडे नाही. आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते व दलित अबालवृध्द मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. सकाळी नाशिकरोड, जेलरोड, दसक, विहितगाव, देवळाली गाव, देवळाली कॅम्प, जुने नाशिक, सातपूर, गंगापूर, अंबड, सिडको आदि उपनगरीय परिसरात कडकडीत बंद नागरिकांनी पाळला.

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवणे पसंत केले. यामुळे कुठेही कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सर्व आंबेडकरी जनतेला शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे शहराची कायदासुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस कुमकही शहरात वाढविण्यात आली होती. शहरातील सर्वच रस्त्यांवर तसेच मुख्य चौकांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले होते.

राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्यात आली होती. रिक्षा, बस वाहतूक बंद होती. सकाळसत्रानंतर सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. सकाळी शाळांची घंटा वाजली तरी व्हॅन व बसवाले काका घरापर्यंत न पोहचल्याने विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत पाठविले नाही. खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयात जाणे टाळले.


द्वारका येथील मुख्य चौक हा शहराचा आत्मा म्हणून ओळखला जातो. या चौकात सकाळी अकरा वाजेच्या सुमरास विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते जमा होण्यास सुरूवात झाली. हळुहळु दलित अबालवृध्द बांधवांचा मोठा जमाव या ठिकाणी जमला आणि घोषणाबाजी करत ‘द्वारका’ बंद केली. शहराचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाणारा द्वारका चौक बंद झाल्याने मुंबई-आग्रा, नाशिक-पुणे, नाशिक-औरंगाबाद महामार्ग ठप्प झाले होते. पोलिसांनी रिंगरोडचा वापर करत शहराबाहेरून वाहतूक वळविली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत द्वारका चौकात ठिय्या आंदोलन सुरू होते.