Fire to the mountains will fall in the depths | डोंगरांना आग लावणे महागात पडणार
डोंगरांना आग लावणे महागात पडणार

नाशिक : शिकार व जंगल संपदा नष्ट करण्याच्या दृष्टीने आदिवासी भागात डोंगर, टेकड्यांना आगी लावण्याचे सातत्याने होणारे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, अशी आग लावणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी वन अधिका-यांना दिले आहेत.
यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने भविष्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आत्तापासूनच चा-याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे आहे त्या चा-याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. चा-याची कमतरता भासू नये म्हणून शासनाने गाळपेरा जमिनीवर वैरण पिके घेण्याची सक्तीच केली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात मात्र वन खात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनींवरील चारा पेटवून देण्याचे प्रकार घडत आहेत. डोंगर, टेकड्यांवर पावसाळ्याामुळे उगवलेले गवत आता सुकू लागले असून, शिकाºयांकडून ससा, हरणे, मोर आदी प्राणी व पक्ष्यांच्या शिकारीसाठी या डोंगर, टेकड्यांना पेटवून देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे वनसंपदा नष्ट होण्याबरोबरच जनावरांसाठी उपयुक्त ठरणारा चारादेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. सदरचा प्रकार रात्रीच्या वेळीच घडत असून, त्यामुळे आग लावणा-यांचा शोध घेणे मुश्कील होत आहे. जिल्ह्यातील पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी या भागातच प्रामुख्याने अशाप्रकारे आगी लावण्याचा प्रकार घडत असल्याने त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांनी काही दिवसांपूर्वी वन खात्याच्या अधिका-यांची बैठक घेऊन डोंगराना आगी लावणा-यांचा शोध घेण्याचा व त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आग लावणा-यांच्या शोधासाठी पथके स्थापन करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.


Web Title: Fire to the mountains will fall in the depths
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.