अक्षय पसायदानासाठी एक तरी वारी अनुभवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:32 AM2018-07-20T01:32:53+5:302018-07-20T01:33:10+5:30

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल... विठ्ठलाला पहाणं म्हणजे वारी. विठ्ठल बोलणं म्हणजेही वारी. विठ्ठलाशी बोलणं म्हणजे वारी. विठ्ठलाबाबत बोलणंही वारीच. आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार करीत रहाणे म्हणजे वारी करणे. वारी वारी जन्म मरणाने वारी. ती ही वारी. एकदा दर्शन देऊन जी संपत नाही ती वारी. एकदा आषाढी देवशयनी एकादशीला विठ्ठल झोपला की कार्तिकीलाच उठतो. मग वारकरी पंढरपुरात जातो म्हणजे देवदर्शन घेऊन नांगरणी, पेरणी करून तृप्त होतो.

Experiencing one-offs for Akshay Paiyadana | अक्षय पसायदानासाठी एक तरी वारी अनुभवावी

अक्षय पसायदानासाठी एक तरी वारी अनुभवावी

Next

किशोर पाठक
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल... विठ्ठलाला पहाणं म्हणजे वारी. विठ्ठल बोलणं म्हणजेही वारी. विठ्ठलाशी बोलणं म्हणजे वारी. विठ्ठलाबाबत बोलणंही वारीच. आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार करीत रहाणे म्हणजे वारी करणे. वारी वारी जन्म मरणाने वारी. ती ही वारी. एकदा दर्शन देऊन जी संपत नाही ती वारी. एकदा आषाढी देवशयनी एकादशीला विठ्ठल झोपला की कार्तिकीलाच उठतो. मग वारकरी पंढरपुरात जातो म्हणजे देवदर्शन घेऊन नांगरणी, पेरणी करून तृप्त होतो. बाबांनो देव नाही झोपत तो तडक पंढरीतून निघून सरळ आपल्या घरात, शेतात राबायला येतो. तो दळण दळतो, शेतातल्या बियांना अंकुर फोडतो. तो पाऊस होऊन पावसातून बरसतो. आपलं धान्य पिकवतो. फळा-फुलांनी संसार पिकवतो. म्हणून आपण निश्चिंत वारी करायला.
स्वत:चं घर, संसार न सोडणाऱ्या सावता माळ्याच्या शेतात तो भेटायला येतो. कांदा मुळा भाजी म्हणत तीच अवघी विठाई माझी म्हणणारा भक्त परमेश्वराला साकडं घालतो. म्हणून पुढची एकादशीची यात्रा सावत्याकडे. ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या एकत्र येतात. तो क्षण अवर्णनीय. दोघांची गळाभेट सोबत निवृत्ती, सोपान, मुक्ताई आहेच नाथ आहेत. ज्ञानोबा मामाच्या घरी विसाव्याला थांबून पुढे येतात. दोघांचे मार्ग भिन्न. दिवेघाट चढताना एरवीचा धापा टाकणारा म्हातारा सहज जमिनीचं पाणी आढ्याला लागलं म्हणत दिवेघाट चढतो. एकदा घाट चढला की विसावा. मग माउली पावली शरीर टाळ-मृदंग होतो. अंतरात घुमत राहतो. दिंडीत प्रत्येक व्यक्ती माउलीच. एखादा पुढे जातो मधे अडखळतो ‘माउली’ हाक दिली की रस्ता तयार. काय ही शिस्त. प्रत्येकाला एकच ध्यास विठ्ठलाचा. येथे जात धर्म पंथ नाहीत. सगळेच भागवत संप्रदायी. वारीला गेलो तेव्हाची गोष्ट. चालण्याची फार सवय नसल्याने पायाला फोड आले. वरती टळटळीत ऊन, पावसाची वाट पहाणे, बाजूला झाडाखाली विसावलो. सोबतचे मित्र एकमेकांचे पायाचे फोड चाचपत होते. तोच एक म्हातारा, अनवाणी शेजारी येऊन बसला. म्हटलं माउली कुठून आलात. परतूर म्हणाला. म्हटलं पायात काही नाही. फोड येतील. म्हाताºयाने पाय दाखवला. एकही फोड नाही. आम्ही आश्चर्यचकित. म्हटलं, माउली वय किती? पंचाहत्तर. माउली बोलावते, ती घेऊन जाते. आमचे पायाचे फोड आपोआप बरे झाले. माउली खाऊ-पिऊ घालते. वेलापूरपर्यंत सारेच वारकरी थकलेले पण तो धाव्याचा क्षण येताच सगळे वारकरी जीव घेऊन उतारावर पळत सुटतात. जणू तुकोबासारखे झाले आपल्यालाही विठ्ठलदर्शन. माता, माउली डोक्यावर कळशा, हंडे, तुळशीवृंदावन घेऊन पळत सुटतात. विठ्ठलमय होतात. असा विठ्ठल बोलावा, बोलवावा. आयुष्यात एक तरी वारी (ओवी) अनुभवावी. मानवता, सात्त्विकता, अथांग भक्ती काय आहे हे कळतं. निदान ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीसोबत आळंदी-पुणे, देहू-पुणे, पुणे-सासवड मोठ्ठा टप्पा पार करावा. मग माउली पाठीवरून प्रेमाचा हात फिरवते. आपल्याला अक्षय पसायदान देते.
(लेखक साहित्याचे अभ्यासक
व कवी आहेत.)

Web Title: Experiencing one-offs for Akshay Paiyadana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.