ठळक मुद्दे इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षा घेण्याचा निर्णय साधारणत: १४ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यासाठी परिक्षार्थी


 नाशिक : निवडणूक प्रक्रिया व मतदानाच्या पद्धतीसह एकूणच भारतीय समाजशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान आहे हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत तालुका पातळीवर परिक्षा घेतल्यानंतर जिल्हास्तरीय उत्तीर्ण निवडण्यात येणार आहे. आयोगाच्या या नवीन निर्णयामुळे मतदार जागृतीला हातभार लागण्यास मदत होणार आहे. 
निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षापासून मतदार जागृती मोहिम हाती घेतली असून, मतदानाचा टक्का वाढून लोकशाही अधिक सृदृढ करण्यासाठी मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती महत्वाची असल्याचे ओळखून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आता वयाच्या अठरा वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रिया, निवडणूक पद्धती, निवडणूक आयोग याबाबत आकर्षण निर्माण होण्यासाठी सामान्य ज्ञान चाचणी परिक्षा घेणाचे ठरविले आहे. साधारणत: १४ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यासाठी परिक्षार्थी ठरविण्यात आले आहे. या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्न पत्रिका असणार आहे, त्यासाठी ३९ प्रश्न आयोगाने निश्चित केले आहेत, मात्र स्थानिक पातळीवर त्यात निवडणूकी संदर्भात आणखी काही प्रश्न यंत्रणेला आवश्यक वाटत असतील तर प्रश्नांची संख्या वाढविण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे समाजशास्त्राबाबतचे ज्ञान जाणून घेणाºया प्रश्नांचा या प्रश्नपत्रिकेत समावेश आहे. मतदार नोंदणीसाठी किती वय असावे, त्यासाठी कोणता अर्ज भरावा, भारतात कोणती मतदान पद्धती आहे, ईव्हीएमचा पुर्ण अर्थ काय, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे, किती वर्षेवयोगटातील व्यक्ती उमेदवारी करू शकतो, लोकसभेची निवडणूक किती वर्षांनी, राज्यसभेची निवडणूक किती वर्षानंतर होते अशा अनेक प्रकारचे प्रश्न या परिक्षेत विचारण्यात येणार आहेत. 
जिल्हा निवडणूक शाखेने निवडणूक आयोगाच्या या परिक्षेची तयारी सुरू केलीअसून, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एक किंवा दोन शाळेच्या विद्यार्थ्यांची परिक्षेसाठी निवड करण्यात येणार आहे. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर पुन्हा स्पर्धा परिक्षा होईल व त्यातून राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.