E. N. Nikam: Literary in the Ambedkar movement | ई. एन. निकम : आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक
ई. एन. निकम : आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक

ठळक मुद्देई. एन. हे ४० वर्षे शासकीय सेवेत अबमारी खात्यात उच्च पदावर काम करीत असले तरी आंबेडकरी विचारांचा त्यांच्यावर पगडा असल्याने ते चळवळीला सर्वतोपरी मदत करीत. त्यांनी लिखाण करून चळवळीला मार्गदर्शन केले.त्यांचा जनसंपर्क व मित्र परिवार मोठा होता.


बाळासाहेब शिंदे /
एकनाथ नानाजी निकम या नावापेक्षा ई. एन. निकम नावाने त्यांची सर्वत्र ओळख. माझी आणि त्यांची अगोदर प्रत्यक्ष ओळख नव्हती परंतु त्यांचे लहान बंधू कालकथित दादाभाऊ निकम हे चळवळीत सोबत काम करीत असल्याने त्यांच्याशी परिचय वाढला. ई. एन. हे ४० वर्षे शासकीय सेवेत अबमारी खात्यात उच्च पदावर काम करीत असले तरी आंबेडकरी विचारांचा त्यांच्यावर पगडा असल्याने ते चळवळीला सर्वतोपरी मदत करीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी आपल्या लहानपणी प्रत्यक्ष पाहिले होते. त्यांची भाषणे ऐकली होती. त्यांच्या बालमनावर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा एव्हढा परिणाम झाला होता की, ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा त्यांनी एक महिना शाळेला दांडी मारली होती. त्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचाही सहवास लाभला होता. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी दादासाहेबांच्या कार्यालयात काम केले होते.

नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचे आई वडील दादासाहेब गायकवाड यांच्यासोबत सत्याग्रही होते. त्यामुळे आंबेडकरी विचारांचा पगडा बालपणापासूनच त्यांच्या मनावर होता. ते शासकीय सेवेत असल्याने त्यांना प्रत्यक्ष चळवळीत भाग घेता येत नसल्याने ते अस्वस्थ होत. त्यामुळे त्यांनी लिखाण करून चळवळीला मार्गदर्शन केले. या साहित्य प्रवासात त्यांनी आजपर्यंत ‘अबिदा’ व ‘दंश’ हे कथासंग्रह लिहिले. ‘कल्पतरूची फुले’, ‘शब्दगंध’ व ‘बकल्प’ हे काव्यसंग्रह लिहिले. ‘समतेची सावली’, ‘वासना जळत आहे’ व ‘आॅफर’ ही नाटके लिहिली. तसेच ‘नवी दिशा’ या कादंबरीची निर्मिती त्यांनी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील निवडक पण महत्त्वाच्या प्रसंगावर आधारीत ‘प्रज्ञासूर्य समतेचा’ हा ग्रंथ आणि ‘भिमाई माऊली’ या काव्यसंग्रहाची निर्मिती त्यांचीच. या व्यतिरिक्त त्यांचा ‘पिसाट वारा मदनाचा’ हा लावणीप्रधान काव्यसंग्रहही प्रकाशित झालेला होता. यासोबतच राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर त्यांचे अनेक लेख वर्तमानपत्रे व मासिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत.

ई. एन. निकम हे आंबेडकरी चळवळीतील अग्रभागी असलेले एक असामान्य व्यक्तिमत्व होते. या सर्व प्रवासात त्यांना त्यांचे बंधू दादाभाऊ निकम यांचे सहकार्य होतेच. त्यामुळे त्यांनी काही काळ आर.पी.आय. पक्षाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यांचा जनसंपर्क व मित्र परिवार मोठा होता. प्रसिद्ध गीतकार शांताराम नांदगावकर यांचे ते व्याही होते.
(नाशिक महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी)


Web Title: E. N. Nikam: Literary in the Ambedkar movement
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.