नाशिक जिल्ह्यात अकरा महिन्यांत हायवेवर सहा बिबट्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू

By Azhar.sheikh | Published: November 25, 2017 04:24 PM2017-11-25T16:24:11+5:302017-11-25T16:37:29+5:30

जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जीवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसीत केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बिबट्या ठार होऊ लागला आहे. यामुळे बिबट्याचे अस्तित्वच जणू धोक्यात सापडले आहे.

Due to the death of six leopard vehicles in the eleven months on the highway in Nashik district | नाशिक जिल्ह्यात अकरा महिन्यांत हायवेवर सहा बिबट्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू

नाशिक जिल्ह्यात अकरा महिन्यांत हायवेवर सहा बिबट्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे वाहनचालकांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे बिबट्यासारख्या वन्यजीव प्रवण क्षेत्रातून मार्गस्थ होताना वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा अधिक नसावा 'वन्यजीवांचा वावर रात्रीच्या वेळी वाहने सावकाश चालवा’ असे सुचना फलकही लावले आहेत

अझहर शेख / नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर अधिक आहे. राष्ट्रीय महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून महामार्ग ओलांडताना विविध महामार्गांवर नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणारा बिबट्यासारख्या चपळ व वेगवान वन्यजीवालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणा-या वाहनांपुढे आपला जीव गमवावा लागत आहे हे दुर्देवच!
नाशिक जिल्ह्यातील निफाड, इगतपुरी, दिंडोरी, बागलाण, सटाणा, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील परिसरात बिबट्याचा अधिवास आढळतो. या भागात त्यामुळे मानव-बिबट्याचा संघर्षही पहावयास मिळतो. पुरेसे भक्ष्य ऊसशेतीमध्ये किंवा परिसरातील विरळ झालेल्या वनक्षेत्रात न मिळाल्यामुळे मानवी वस्तीकडे भरकटणारा बिबट्या कधी शेतक-यांच्या पशुधनावर तर कधी लहान मुलांवर हल्ले करत असल्याच्या अनेक घटना या भागामध्ये घडल्या आहेत. दरम्यान, या तालुक्यांमधून जाणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना बिबट्यांना जीव गमवावा लागला आहे. एकूणच महामार्गावरुन जाणा-या वाहनांची असलेली गती आणि बिबट्याची महामार्ग ओलांडताना उडणारी भंबेरी यामुळे बिबट्याला प्राणाला मुकावे लागत आहे. बिबट्यासारखे अन्य वन्यजीवांचाही महामार्गाच्या परिसरात असलेल्या वनक्षेत्रात वावर असू शकतो हे लक्षात घेऊन त्या वनपरिक्षेत्रांच्या हद्दीत संबंधित वनविभागाने 'वन्यजीवांचा वावर रात्रीच्या वेळी वाहने सावकाश चालवा’ असे आवाहन वजा सुचना करणारे फलकही लावले आहेत; मात्र वाहनचालक सदर परिसरातून मार्गस्थ होताना महामार्गावर वाहनांचा वेग मर्यादेचे पालन करत नाही. त्यामुळे अचानकपणे संध्याकाळनंतर भक्ष्याच्या शोधात भटकं ती करणा-या बिबट्यासारख्या वन्यजीवांना आपले प्राण वाहनांच्या धडकेत गमवावे लागत आहे.
---इन्फो--
बिबट्याच्या अस्तित्वालाच धोका !
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्याचा असलेला अधिवास धोक्यात आला आहे. ऊसाच्या क्षेत्रात किंवा अन्य शेतीच्या क्षेत्रात व मोकळ्या भुखंडावर भक्ष्याचा पाठलाग करताना अनेकदा बिबट्याची वाट चुकते आणि संरक्षक कठडे नसलेल्या जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जीवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसीत केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बिबट्या ठार होऊ लागला आहे. यामुळे बिबट्याचे अस्तित्वच जणू धोक्यात सापडले आहे.

जिल्ह्यात अकरा महिन्यांत ठार झालेले बिबटे
नाशिक-मुंबई महामार्ग - पाडळी शिवारात १, विल्होळी शिवारात १
नाशिक पुणे महामार्ग - सिन्नर वनपरिक्षेत्रात २
सिन्नर-घोटी राज्य महामार्गावर १
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड शिवारात १

वेग नियंत्रणात असेल तर अपघात टाळणे शक्य
महामार्गावरून जरी प्रवास करत असलो तरी अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून सुरक्षित प्रवास होण्यास मदत होईल. वेग नियंत्रणात व मर्यादेत असल्यास अचानकपणे बिबट्यासारखे वन्यजीव अथवा कुत्रे किंवा एखाद्यावेळी मनुष्यही रस्ता ओलांडताना समोर आल्यास वाहन नियंत्रीत करणे शक्य होऊन अपघात टाळता येऊ शकतो; मात्र जर अमर्याद वेगाने वाहन धावत असेल तर मात्र अपघात टाळणे वाहनचालकांना शक्य होत नाही. अशावेळी स्वत:ची सुरक्षा धोक्यात आल्याचे लक्षात येताच वाहनापुढे आलेला वन्यजीव अथवा कुत्र्यालाही वाहनचालक धडक देऊन पुढे मार्गस्थ होतो. त्यामुळे बिबट्यासारख्या वन्यजीव प्रवण क्षेत्रातून मार्गस्थ होताना वाहनाचा वेग नियंंत्रणात व मर्यादेपेक्षा अधिक नसावा, असे आवाहन वनअधिका-यांनी केले आहे.

 

Web Title: Due to the death of six leopard vehicles in the eleven months on the highway in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.