दिनकर अहेर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामखेडा : कला हा कलाकाराचा आत्मा असतो आणि तो त्याशिवाय जगू शकत नाही. असेच एक कलेचे उपासक असलेल्या निवृत्त शिक्षकाने आपल्या नखांच्या साह्याने कागदावर अनेक वेगवेगळी चित्रे रेखाटून आगळावेगळा छंद जोपासला आहे.
देवळा तालुक्यातील खामखेडा येथील सेवानिवृत कलाशिक्षक नामदेव शेवाळे यांनी अनेक चित्रे रंग व ब्रशने रेखाटली. पण सेवानिवृत्तीनंतर हा चित्रे काढण्याचा छंद त्यांना गप बसू देईना. कोणत्याही जाड कागदावर नखाने दाब देऊन उमटवलेले (एम्बास) चित्र रेखाटता येतात. केवळ नखाच्या साह्याने चित्रे रेखाटने ही जादुई कलेची देणगीच म्हणावी लागेल.
रेषा, छटा, उमटवण्यासाठी नखाचा योग्य तेवढा दाबाचा वापर केलेला दिसतो. यापूर्वी त्यांनी सटाणा येथील नगरपालिका वाचनालयात सुंदर हस्ताक्षर व नख चित्राचे प्रदर्शन भरविले आहे.त्यांना बागलाण गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.