प्रभागसभेत प्रशासनाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:24 AM2018-12-22T00:24:48+5:302018-12-22T00:25:05+5:30

वालदेवी नदीत गटारी, नाले व भूमिगत गटारीचे मिळणारे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी, बंद पथदीप , मनपाच्या धूळखात पडून असलेल्या वास्तू आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभागच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले.

In the divisional division, the administration took control | प्रभागसभेत प्रशासनाला धरले धारेवर

प्रभागसभेत प्रशासनाला धरले धारेवर

Next

नाशिकरोड : वालदेवी नदीत गटारी, नाले व भूमिगत गटारीचे मिळणारे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी, बंद पथदीप , मनपाच्या धूळखात पडून असलेल्या वास्तू आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभागच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक शुक्रवारी सकाळी प्रभाग सभापती पंडित आवारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत नगरसेविका रंजना बोराडे यांनी मनपाची जुनी इमारत व वाचनालय धूळखात पडले असून, त्याच्यावर हजारो रुपये विनाकारण खर्च केला जात आहे. मनपाच्या अनेक इमारती, समाजमंदिर, व्यायामशाळा, वाचनालय, हॉल आदी धूळखात पडले असून, त्याच्यावर खर्च केलेले लाखो रुपये वाया जात आहे. मनपाने रहिवाशांच्या उपयोगासाठी बांधलेल्या इमारती, हॉल या सामाजिक संस्थेस चालविण्यात देण्यात याव्या, अशी मागणी बोराडे यांनी केली.
वडनेरमार्गावरील अनधिकृत भंगरची दुकाने हटविण्यात यावी, बंद पथदीप सुरू करावे, खराब झालेल्या पथदीपाचे पोल बदलण्यात यावे, भुयारी गटारीचे सर्वेक्षण करावे. अनेक हॉटेल व्यावसायिक नाल्यांमध्ये घाण पाणी सोडतात त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका संगीता गायकवाड, अंबादास पगारे यांनी केली. नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी दुर्गा उद्यान येथील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक धूळ खात पडले असून, अस्वच्छता पसरलेली आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते त्वरित बुजवावे, अशी मागणी केली.
बैठकीला नगरसेवक केशव पोरजे, नगरसेवक मीराबाई हांडगे, सुनीता कोठुळे, मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर नगरसेवक व अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची पाहणी केली.
वालदेवी नदीचे आरोग्य धोक्यात
नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी वालदेवी नदीमध्ये गटारी, नाले, भूमिगत गटारी यातील दुर्गंधीयुक्त दूषित पाणी मिसळले जात असल्याने वालदेवी नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीतील पाण्याला उग्र वास येत असून परिसरातील रहिवाशांना त्वचेचे आजार होत आहे. नदी पात्रात मिसळणारे दुर्गंधीयुक्त पाणी त्वरित बंद करावे अन्यथा नदी पात्रात बसून उपोषण करू, असा इशारा गाडेकर यांनी दिला.

Web Title: In the divisional division, the administration took control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.