जिल्हा प्रशासनाची आता विधानसभेची पूर्वतयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 01:40 AM2019-05-28T01:40:26+5:302019-05-28T01:40:53+5:30

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उर्वरित कामांचा धडका सुरू झाला असतानाच विधानसभा निवडणुकी-संदर्भातील पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने कामांचे नियोजन करण्यासही प्रारंभ केला आहे.

 District administration is now preparing for the Legislative Assembly | जिल्हा प्रशासनाची आता विधानसभेची पूर्वतयारी

जिल्हा प्रशासनाची आता विधानसभेची पूर्वतयारी

Next

नाशिक : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उर्वरित कामांचा धडका सुरू झाला असतानाच विधानसभा निवडणुकी-संदर्भातील पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने कामांचे नियोजन करण्यासही प्रारंभ केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय मतदार याद्यांच्या पडताळणीचे काम प्राधान्याने हाती घेण्याचा निर्णय घेतला असून, तालुकानिहाय मयत मतदारांची माहिती मागविली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून विधानसभेच्या कामकाजाची तयारी सुरू केलेली आहे. निवडणूकप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना काहीअंशी उसंत मिळाली आहे. त्यामुळे लागलीच विधान सभेचे कामकाज हाती घेतले जाणार नसले तरी येत्या पंधरा ते वीस दिवसांत याद्यांच्या पडताळणी कामाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.  लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता जिल्ह्णातील सर्वच तालुक्यांमधील मतदारांची माहिती गोळा करण्याचे मोठे आव्हान जिल्हा यंत्रणेपुढे आहे. ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा आताच कामकाजाला सुरुवात होण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. मतदारांची एकूण संख्या, घटलेली आणि वाढलेली मतदारसंख्या यांची माहिती घेतली जाणार असून, तालुकानिहाय मयत मतदारांची माहिती प्रथम प्राधान्याने घेतली जाणार आहे.
लोकसभा आणि विधानसभेच्या कामाच्या व्याप्तीमध्ये फरक असल्याने विधानसभेच्या एकूणच तयारीचा भाग म्हणून मतदान केंद्रांच्या समन्वयाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी व्यतिरिक्त तीन मतदान केंद्रे मिळून एक अधिकारी नियुक्तीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. प्रत्येक तालुक्यामधील मतदान केंद्र, त्यामधील अंतर आणि संवेदनशील केंद्र यांचा विचार करून समन्वय राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय अथवा बैठक झालेली नसली तरी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने काही बाबींचा नव्याने विचार केला जाणार आहे.

Web Title:  District administration is now preparing for the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.