भर उन्हात भाविकांचे सप्तशृंगगडाकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 06:04 PM2019-04-16T18:04:26+5:302019-04-16T18:05:01+5:30

मालेगाव : डोक्यावर आग ओकणारा सूर्य.. पायाखाली तळपती भुई.. हातात भगवा झेंडा.. खांद्यावर पिशवी सोबत ढोलताशा व डीजेचा नाद.. मुखी आदिशक्ती सप्तशृंगीचा जयघोष करीत मध्य प्रदेशासह उत्तर महाराष्टÑातील हजारो भाविक सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवासाठी वणीच्या दिशेने निघाले आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे मालेगाव शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. मजल दरमजल करीत हजारो भाविक साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धेशक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. भाविकांची सेवा घडावी यासाठी यात्रा मार्गातील विविध गावातील नागरिकांनी पाणपोई, अन्नछत्र उभारले आहे. दरम्यान सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका देवीभक्तांना बसला. अचानक आलेल्या पावसामुळे भक्तांची निवाऱ्यासाठी धावपळ उडाली होती.

 The devotees left the road to Saptashringangad | भर उन्हात भाविकांचे सप्तशृंगगडाकडे प्रस्थान

भर उन्हात भाविकांचे सप्तशृंगगडाकडे प्रस्थान

Next

उत्तर महाराष्टÑातील खान्देशातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून सप्तशृंगी देवीचा गड ओळखला जातो. दरवर्षी चैत्रपौर्णिमेला गडावर चैत्रोत्सव साजरा केला जातो. या यात्रोत्सवानिमित्त खान्देश भागातील अमळनेर, भडगाव, पाचोरा, जळगाव, धुळे यासह मध्य प्रदेशातील इंदूर, सेंधवा, उत्तर महाराष्टÑातील विविध शहरांमधून लाखो भाविक देवीचरणी लीन होतात. पदयात्रा करत हजारो भाविक गडावर पोहोचतात. सध्या कसमादे भागातील सर्वच रस्ते देवीभक्तांनी फुलून गेले आहेत.
सध्या मालेगाव शहर परिसराचे तापमान ४२ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले जात आहे. उन्हाच्या तीव्रतेची परवा न करता हजारो भाविक पदयात्रा करीत आहेत. शहर परिसरात धार्मिक वातावरणाची निर्मिती झाली आहे. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हावी यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, संस्था, मित्रमंडळांकडून पाणी, जेवणाची व निवासाची व्यवस्था केली जात आहे. दरेगाव गावाजवळ दरेकर परिवाराकडून गेल्या १७ वर्षांपासून भाविकांसाठी नास्ता-अन्नछत्र उभारले जाते. तसेच मंडप टाकून विश्रांतीची सोय केली जाते. याच भागात अल कबीर या शाळेतही भाविकांच्या विश्रांतीची सोय करण्यात आली आहे. देवीचा मळा, नवीन बसस्थानक भागात पिण्याच्या पाण्याची, तर पांजरापोळ शॉपिंग सेंटर भागात भाविकांसाठी फराळ, नास्त्याचे वाटप करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ विधायक मित्रमंडळाने पाण्याची व औषधांची सोय केली आहे. सटाणा रस्त्यावर मालेगाव केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे गडावर जाणाºया भाविकांची वैद्यकीय सेवा केली जात आहे. २४ तास सुरू राहणाºया या तात्पुरत्या सेवा केंद्रात असोसिएशनचे जवळपास २० ते २५ सदस्य कार्यरत आहेत.
सटाणा रस्त्यावरील श्रीगुरुदेव भक्तमंडळातर्फे गेल्या २९ वर्षांपासून देवीभक्तांसाठी जेवणाची सोय केली जाते. अष्टमीपासून सुरू होणारे अन्नछत्र जवळपास आठवडाभर चोवीस तास सुरू असते. सटाणा नाका भागात जागोजागी पाणपोयी सुरू करण्यात आल्या आहेत.
सोयगाव येथील भाग्यलक्ष्मी कार्यालय भाविकांच्या सेवेसाठी अहोरात्र खुले ठेवण्यात आले. या ठिकाणी भाविकांच्या जेवणाची, झोपण्याची तसेच अंघोळीचीसुद्धा सोय करण्यात आली आहे. टेहरे चौफुली येथेही पाणपोयी सुरू करण्यात आली आहे.

Web Title:  The devotees left the road to Saptashringangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.