नाशिक : केंद्र सरकारने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी राज्यपातळीवर प्रत्येक गावागावातून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या संदर्भात राज्याच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने या अभियानादरम्यान राबवावयाच्या उपक्रमांचे वेळापत्रकच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना ठरवून दिले आहे. त्यात प्रामुख्याने गावागावात स्वच्छते संदर्भात जागृती करणे, हगणदारी मुक्तीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे, प्रचारफेरी, स्वच्छता दिंडी काढणे, शाळा, अंगणवाड्यांमध्ये स्वच्छता दिवस पाळणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपआरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबविणे, साप्ताहिक बाजाराच्या दिवशी असलेल्या समूह शौचालयाची देखभाल दुरुस्ती करणे, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो इत्यादी सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता मोहीम राबविणे. अधिकाºयांनी गाव भेटी देणे व भेटी दरम्यान रात्रीचा मुक्काम करावा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.