शहरात उन्हाचा तडाखा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:00 AM2019-04-29T01:00:00+5:302019-04-29T01:00:16+5:30

मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरश: भाजून निघाले आहेत.

 The city has been hit by the heat | शहरात उन्हाचा तडाखा कायम

शहरात उन्हाचा तडाखा कायम

Next

नाशिक : मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरश: भाजून निघाले आहेत.
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.८ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. आठवडाभरापासून शहरवासीयांना उन्हाच्या कडाक्याने हैराण केले आहे. प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने तापमानात वाढ झाली आहे. समुद्रकिनाऱ्यावर चार ते पाच अंशांनी तापमान वाढल्याने उष्णतेची लाट मध्य-उत्तर महाराष्टÑासह विदर्भात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने सोमवार (दि.२९) पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नाशिककरांना उन्हाचा दाह सोसवेनासा झाला आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाययोजनांवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बुधवारपासून नाशिककर कडक्याच्या उन्हाचा सामना करत आहेत. ३८ अंशांवरून तापमानाचा पारा थेट चाळिशीपार पोहोचला. ४०.९ अंश इतके तापमान बुधवारी नोंदविले गेले, तर गुरुवारी काहीअंशी घट होऊन पारा ४०.५ अंशांवर स्थिरावला; मात्र शुक्रवारपासून अचानकपणे वातावरणात कमालीचा उष्मा वाढल्याने मागील दहा वर्षांपेक्षा अधिक तापमान शनिवारी व रविवारी नोंदविले गेले.
रस्ते निर्मनुष्य; अघोषित संचारबंदी
दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसून आली नाही. त्यामुळे जणू शहरात अघोषित संचारबंदी लागू झाली की काय, असे चित्र पहावयास मिळत होते. संपूर्ण शहर सकाळपासून संध्याकाळपर्यंत सामसूम झालेले पहावयास मिळाले. सूर्यास्तानंतरही नाशिककरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. २८ मार्चमध्ये या हंगामात पहिल्यांदा पारा चाळिशीपार सरकला, तर एप्रिलअखेर कमाल तापमानाची ४२.८ अंश ही विक्रमी नोंद ठरली. उन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title:  The city has been hit by the heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.