सुदर्शन सारडा ओझर
निफाड तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा ओझर गट स्वर्गीय आमदार रावसाहेब कदम यांच्यापासून ते थेट विद्यमान आमदार अनिल कदम यांच्यापर्यंत प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मताधिक्य देत आलेला आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले हे गाव ज्या उमेदवाराला मताधिक्य देईल त्याचा विजय निश्चित हेदेखील समीकरण आहे, असे जुनी मंडळी सांगतात. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हा गट इतर मागासवर्ग पुरुष या वर्गासाठी आरक्षित झाल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष ज्या ज्या गटांमध्ये असेल त्यात ओझर हे सर्वात अव्वल राहील यात शंका नाही.
हा गट आमदार अनिल कदम यांचे घरचे मैदान असल्यामुळे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत याच ओझर गटाने आमदारकी शाबूत ठेवली म्हणूनदेखील. दुसरीकडे गावातील इतर मातब्बर नेत्यांनी केलेली पूर्वतयारी पाहता सर्वात लक्षवेधी ओझर गट राहणार हे मात्र आताच निश्चित झाले आहे.
वेळ आल्यास चौरंगी लढतीचे योग देखील ओझरकारांच्या नशिबी असण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून ओझरमध्ये तरी आमदार अनिल कदम घेतील तो निर्णय सर्वकाही समजला जात असला तरी गेल्यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुभवातून त्यांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची घेतलेली भूमिका भल्याभल्यांना चिंतेत टाकणारी आहे.
ओझर गणात कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ असेल हे येणारा काळ ठरवेल. राज्यात युती जरी असली तरी स्थानिक पातळीवर स्वत:ची ताकत समजण्यासाठी भाजपा कुठल्याही परिस्थितीमध्ये युती करण्यास तयार नाही.
दुसरीकडे सध्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी असलेल्या नागरिक आघाडीकडून विद्यमान सदस्य यतीन कदम हेच उमेदवार राहणार असून, गेल्या अनेक महिन्यापासून एचएएलच्या सहकार्याने रस्त्यांचे डांबरीकरण असो किंवा इतर विविध कामांच्या माध्यमातून ते कामालादेखील लागले आहेत.