...हे धाडस वाखाणण्याजोगे ! 

By श्याम बागुल | Published: June 19, 2019 07:00 PM2019-06-19T19:00:56+5:302019-06-19T19:01:48+5:30

नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीने लढविल्या व अपेक्षेप्रमाणे त्या गमावल्यादेखील. नाशिकच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा राष्टÑवादीला पराभवाचे धनी व्हावे लागले हा नवीन विक्रम या निमित्ताने पक्षाच्या खात्यावर जमा झाला.

... this is a brave warrior! | ...हे धाडस वाखाणण्याजोगे ! 

...हे धाडस वाखाणण्याजोगे ! 

googlenewsNext

 श्याम बागुल
लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेच्या विरोधात लढताना अक्षरश: पालापाचोळा झालेल्या कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसने या पराभवाच्या नैराश्येच्या गर्तेत अडकून न पडता लगोलग विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ही तयारी करताना दोन्ही पक्षांनी स्वतंत्र बैठका घेऊन तालुका, जिल्हाध्यक्षांकडून विधानसभानिहाय आढावा घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य मतदारसंघाची चाचपणीही सुरू केली आहे. दोन्ही पक्षांच्या बैठकांमध्ये एकमेकांची उणी-दुणी काढण्यात येऊन कोणी कोणत्या मतदारसंघात कसा दगाफटका केला याचे अनुभव कथन करण्याबरोबरच, सन्मानाने जागा वाटप झाल्यास आघाडी करावी अन्यथा (नसलेल्या) बळावर निवडणूक लढविण्यास तयार असल्याचा जो काही संदेश सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आहे तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.


नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीने लढविल्या व अपेक्षेप्रमाणे त्या गमावल्यादेखील. नाशिकच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा राष्टÑवादीला पराभवाचे धनी व्हावे लागले हा नवीन विक्रम या निमित्ताने पक्षाच्या खात्यावर जमा झाला. दिंडोरीच्या जागेबाबत पक्ष नाशिकपेक्षा अधिक खात्री बाळगून होता. बारामतीनंतर दिंडोरी मतदारसंघ पक्षासाठी सुरक्षित मानला जात असताना तेथेही पक्षाला जोरदार फटका बसला. अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणमीमांसा पक्ष पातळीवर होऊन अख्ख्या देशातच भल्याभल्यांची धूळधाण उडालेली असताना समीर भुजबळ काय किंवा धनराज महाले काय दोहोंचा पराभव फार विशेष नसल्याची भावना पक्ष पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांनी बाळगली आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे असेल असे सांगून कॉँगे्रस व राष्टÑवादी कॉँग्रेस अजूनही आशावादी असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होणे साहजिकच आहे. त्यामुळेच की काय राष्टÑवादीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पक्षाच्या पदाधिका-यांनी अजूनही पक्षाला किती व कसे अनुकूल वातावरण आहे, याचे आभासी चित्र रंगवित, जिल्ह्यातील तेरा विधानसभेच्या जागांवर दावा ठोकला आहे. हा वादा ठोकताना जणू काही विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही अशा आविर्भावात सामाजिक व राजकीय गणिते मांडून इच्छुकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. मुळात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला त्या त्या विधानसभा मतदारसंघात मिळालेली आकडेवारी ताजी असून, त्यात नजीकच्या काळात राजकीय व सामाजिक बदल होण्याची सूतराम शक्यता नाही, या वास्तवाशी एकतर पदाधिकारी असहमत असावेत किंवा ते स्वत:च स्वत:ची फसवणूक करून घेत असावेत. असाच काहीसा प्रकार जिल्हा कॉँग्रेसच्या बैठकीत घडला आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान राष्ट्रवादीने विश्वासात घेतले नाही, असा सूर आळवणा-या पदाधिका-यांच्या मतदारसंघातच कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पिछाडीची मते मिळाल्याचे सोयीस्कर विसरलेल्या पदाधिका-यांनी सन्मानाने आघाडी न झाल्यास स्वबळावर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच पंधरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची भाषा केली आहे. मुळात गेल्या पाच वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक जागा उमेदवाराअभावी पक्षाला लढविता आलेल्या नाहीत, पक्षाच्या ताब्यातून सत्तेची सारी सूत्रे जनतेने कधीच हिसकावून घेतलेली असून, कार्यकर्तेही पक्ष कार्यालयाकडे फिरकेनासे झालेले आहेत. अशा परिस्थितीतही कॉँग्रेस पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असेल तर त्यांचे हे धाडसदेखील वाखाणण्याजोगे आहे.

Web Title: ... this is a brave warrior!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.