तुकाराम मुंडे यांची बदली करूनही भाजपा चिंतित

By श्याम बागुल | Published: November 23, 2018 04:46 PM2018-11-23T16:46:38+5:302018-11-23T16:49:14+5:30

गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवक आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या महापालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते. परंतु मुंडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळे शक्य होत नव्हते. मुंडे यांनी आपल्या पद्धतीनेच महापालिकेचा कारभार हाकण्याबरोबरच, सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी,

BJP is worried even after replacing Tukaram Munde | तुकाराम मुंडे यांची बदली करूनही भाजपा चिंतित

तुकाराम मुंडे यांची बदली करूनही भाजपा चिंतित

Next
ठळक मुद्देप्रतिमेचा प्रश्न : श्रेय घेणे अंगलट येण्याची शक्यता

नाशिक : भ्रष्टाचार विरोधी व कायद्याच्या कसोटीवरच काम करणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली करून भाजपाचे मुखंड उत्साह व जल्लोष साजरा करीत असले तरी, मुंडे यांची जनमानसातील प्रतिमा पाहता, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून भाजपाने आपला खरा चेहरा समोर उघड केल्याची भावना जनमानसात व्यक्त केली जात असल्याने भाजपाच्या एका गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खुल्यापणाने हा गट मुंडे यांच्या बदलीच्या प्रकरणात जाहीरपणे काही बोलत नसला तरी, आगामी निवडणुकीत जनतेकडून मुंडे यांच्या बदलीबाबत जाब विचारल्यास काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवक आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या महापालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते. परंतु मुंडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळे शक्य होत नव्हते. मुंडे यांनी आपल्या पद्धतीनेच महापालिकेचा कारभार हाकण्याबरोबरच, सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, गटार या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. परिणामी मुंडे जनतेत लोकप्रिय तर झालेच, परंतु काम न करणा-या महापालिकेच्या अधिकाºयांना नकोसे तर नको त्या कामात ‘अर्थ’ शोधणाºया लोकप्रतिनिधींना अडचणीचे ठरले होते. लोकांना जे हवे ते देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंडे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवून नागरिकांच्या महापालिकेच्या संबंधित तक्रारी अवघ्या चोवीस तासात सोडविण्यास सुरुवात केल्याने त्यांना जनमानसातून मिळत असलेला पाठिंबा सत्ताधारी भाजपाच्या जिव्हारी लागला होता. त्यातूनच मुंडे जर आणखी काहीकाळ नाशकात थांबले तर भाजपासाठी ते अडचणीचे ठरणार असल्यामुळेच त्यांच्या बदलीचा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्यात आला. 

मुंडे यांची आता बदली झाली असली तरी, मुंडे यांच्या कामकाजावर समाधानी असलेल्या नाशिककरांच्या नाराजीचा सामना भाजपाला करावा लागणार आहे. मुंडे यांच्या कायदेशीर कामकाजामुळे मुठभरच लोकांना त्रास झाला व ज्यांना झाला त्यांचा जनमानसातील वावर अगदीच अल्प आहे. त्यांच्यापासून पक्षाला कितपत फायदा होईल, असा विचार आता भाजपातील मंडळी करू लागली असून, निव्वळ महापालिकेतून स्वहित साधण्यासाठीच मुंडे यांच्या बदलीला प्रतिष्ठेचा प्रश्न करणा-यांमुळे भाजपाला नुकसानच होण्याची भीती खासगीत व्यक्त होवू लागली आहे. अशातच काही लोकप्रतिनिधी जाहीरपणे मुंडे यांच्या बदलीचे समर्थन करीत असल्यामुळे तर भाजपा भ्रष्टाचाराला पाठिंबा देते, असा संदेश जनमानसात गेला आहे.

Web Title: BJP is worried even after replacing Tukaram Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.