ठळक मुद्देराज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि गिरीष बापट यांनी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाजूला जात सुमारे दहा मिनिटे केली चर्चा पुण्यातीलही मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची विनंती

नाशिक - एरव्ही भाजपा आणि मोदी सरकारवर सडकून टीका करणारे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी भेट घेतली आणि उभयतांमध्ये उभ्यानेच दहा मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर, गिरीश बापट यांनी आपली राज यांचेशी ३५ वर्षांपासूनची मैत्री असून त्यांचा मी सल्ला घेत असतो, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे गुरुवार (दि.९) पासून नाशिक दौऱ्यावर आहेत. राज यांचा गोल्फ क्लबवरील शासकीय विश्रामगृहात मुक्काम होता. राज यांच्याच दालनाजवळ भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट हे सुद्धा सुनावणीच्या कामांसाठी आलेले होते. सकाळी राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन करण्यासाठी निघाले असताना समोरुन गिरीश बापट यांची स्वारी अवतरली आणि दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन करत ख्यालीखुशाली विचारली. त्यानंतर, राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि गिरीष बापट यांनी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाजूला जात सुमारे दहा मिनिटे चर्चा केली. त्यानंतर, पत्रकारांनी गिरीश बापट यांना विचारले असता, बापट यांनी सांगितले, राज यांचेशी माझी गेल्या ३५ वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांचा सल्ला मी घेत असतो. मनसेने फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनात पुण्यातीलही मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसात गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर गुन्हे मागे घेण्याची विनंती बाळा नांदगावकर यांनी केली. परंतु, गुन्हे मागे घेण्याचे काम सरकारचे नाही. सदर प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. सरकारकडे जर गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव आला तर त्यासाठी एक समिती आहे आणि या समितीवर मी सुद्धा सदस्य आहे. परंतु, न्यायप्रवीष्ट बाबीवर अधिक बोलणे योग्य होणार नाही, असे सांगत बापट यांनी याव्यतिरिक्त कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. राज आणि बापट यांच्यातील भेटीची चर्चा नंतर मात्र उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.