बर्ड फेस्टिव्हल : नांदूरमधमेश्वरमध्ये पक्षीप्रेमींची मांदियाळी; रविवारी समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 09:28 PM2018-01-20T21:28:54+5:302018-01-20T21:30:15+5:30

दरवर्षी हिवाळ्यात या अभयारण्यात विविध स्थलांतरित पक्ष्यांचे संमेलन भरलेले पहावयास मिळते. सध्या या जलाशयाच्या परिसरातील बदकांच्या विविध प्रकारांसह बगळ्यांच्या विविध जाती व करकोच्यांचे थवे विहार करताना नजरेस पडत आहेत.

 Bird Festival: Birds of the birds in Nanduram Lord; Closed on Sunday | बर्ड फेस्टिव्हल : नांदूरमधमेश्वरमध्ये पक्षीप्रेमींची मांदियाळी; रविवारी समारोप

बर्ड फेस्टिव्हल : नांदूरमधमेश्वरमध्ये पक्षीप्रेमींची मांदियाळी; रविवारी समारोप

Next

नाशिक : नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणथळ जागेवर विकसित करण्यात आलेले पक्षी अभयारण्य विविध स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते, मात्र हे अभयारण्य लोकप्रियतेपासून काहिसे वंचित राहिले होते. यावर्षी प्रथमच वन्यजीव विभागाने पुढाकार घेत ‘बर्ड फेस्टिव्हल’भरविल्याने पक्षीप्रेमींची जत्रा भरली आहे.
निफाड तालुक्यातील चापडगाव येथील निसर्ग संकु ल केंद्र अर्थात पक्षी अभयारण्याच्या मुख्य पक्षी निरीक्षण केंद्राच्या आवारात तीनदिवसीय महोत्सवाला मागील शुक्रवार (दि.१९) पासून प्रारंभ झाला आहे. या पक्षी महोत्सवांतर्गत विविध वन्यजीव छायाचित्रकार, अभ्यासक, पयार्वरण तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्रांच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात पर्यावरणविषयक व जैवविविधतेमधील अन्नसाखळीच्या महत्त्वाविषयी मंथन घडून येत आहे.

या चर्चासत्रांसाठी चापडगाव परिसरातील एकूण अकरा गावांमधील प्राथमिक शाळांसह माध्यमिक शाळांचे विद्यार्थी व शहरातील सिडको, इंदिरानगर, सातपूर, गंगापूररोड आदी परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांची सतत वर्दळ आहे. दोन दिवसांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी भेटी दिल्याचा दावा वन-वन्यजीव विभागाने केला आहे. वन्यजीव छायाचित्रकार अतुल धामणकर, राजू कसांबे, नंदकिशोर दुधे, विभास अमोनकर, डॉ. डेर्ले, दत्ता उगावकर, अभय केवट, डॉ. प्राची मेहता आदींनी मार्गदर्शन केले. विविध शाळांचे विद्यार्थी चर्चासत्राला उपस्थित राहिल्याने भावी पिढीमध्ये निसर्गाविषयी नक्कीच जागृती होण्यास मदत होणार आहे.


दरवर्षी हिवाळ्यात या अभयारण्यात विविध स्थलांतरित पक्ष्यांचे संमेलन भरलेले पहावयास मिळते. सध्या या जलाशयाच्या परिसरातील बदकांच्या विविध प्रकारांसह बगळ्यांच्या विविध जाती व करकोच्यांचे थवे विहार करताना नजरेस पडत आहेत. गढवाल, शॉवलर, स्पूनबिल, पेंटेड स्टॉर्क , तलवार, जांभळी पाणकोंबडी, डोमिसील क्रेन, जांभळ बगळा, लालसरी आदी पक्ष्यांनी अभयारण्य गजबजले आहे. नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये सुरू असलेले पक्षी संमेलन अंतिम टप्प्यात आले असून, थंडीचा जोर जसा ओसरू लागेल तसे परदेशी पाहुणे येथून मायदेशी परतण्यास सुरुवात होणार असल्याचे पक्षीप्रेमी सांगतात. महोत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील उपस्थित राहणार आहे.
 

Web Title:  Bird Festival: Birds of the birds in Nanduram Lord; Closed on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.