भुजबळांच्या येवल्यातही फटाके लागले फुटू...!

By किरण अग्रवाल | Published: June 23, 2019 01:24 AM2019-06-23T01:24:39+5:302019-06-23T01:29:29+5:30

भुजबळ यांना येवल्याचा रस्ता दाखविणाऱ्या माणिकराव शिंदे यांनी विधानसभेसाठी पुन्हा दंड थोपटून भुजबळांकडेच उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे भुजबळ माघारी फिरतील अशी शक्यता नसली तरी राजकीय वातावरण बदलते आहे याचा संकेत यातून घेता यावा. कारण तो येवल्यातच नव्हे, नांदगावातही राजकारण ढवळू शकणारा आहे.

 Bhujbal erupted in fire crackers ...! | भुजबळांच्या येवल्यातही फटाके लागले फुटू...!

भुजबळांच्या येवल्यातही फटाके लागले फुटू...!

Next
ठळक मुद्दे माणिकराव शिंदे यांच्या आमदारकीच्या अपेक्षांना नव्याने फुटले धुमारे आता घड्याळाचे काटे कसे फिरतात याची उत्सुकता समीर भुजबळ यांच्या पराभवानंतर येवल्यातील गणिताची फेरमांडणी

सारांश

दिवाळी उलटून गेल्यानंतर पडून राहिलेले फटाके उशिराने अगर पुढच्या दिवाळीला फोडायला घेतले तर ते सादडलेले निघण्याचा धोका असतो. पण राजकारणात पडून राहिलेले असोत, की नवीन; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सारे फटाके फुटणारेच निघतात, कारण भविष्यकालीन अपेक्षांबरोबर भूतकालीन अपेक्षाभंगाचा दारूगोळा कधी सादळत नसतो. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळांच्या येवल्यात जे राजकीय फटाके फुटू लागले आहेत, त्याकडे याच संदर्भाने बघता येणारे आहे.
लोकसभा निवडणुकीतील समीर भुजबळ यांच्या पराभवानंतर येवल्यातील गणिताची फेरमांडणी करून बघण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तेथील भुजबळ समर्थक अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळ यांना आता थांबण्याचा सल्ला देत आपल्याला उमेदवारी देण्याची अपेक्षा एका जाहीर विनंती पत्राद्वारे व्यक्त केली आहे. २००४मध्ये याच माणिकरावांनी भुजबळांना येवल्याचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर २००९ मध्ये तेच भुजबळांविरुद्ध शिवसेनेतर्फे लढून पराभूत झाले व पुन्हा भुजबळांच्या साथीला गेले. परंतु आता अपेक्षावजा उपेक्षेचा फटाका त्यांनी फोडून दिल्याने येवल्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकीय परिघावरील वातावरण तापून जाणे स्वाभाविक ठरले आहे.
मुळात माणिकराव शिंदे यांची आमदारकीची अपेक्षा लपून राहिलेली नाही. तालुक्यातील राजकीय शह-काटशहाचा भाग म्हणून, स्वत:च कबूल केल्याप्रमाणे अनेकांचे राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी भुजबळांना त्यांनी येवल्यात आणले; परंतु ते करताना त्यांच्या स्वत:च्या पदरात काही पडू शकले नाही. बघता बघता तीन पंचवार्षिक टर्म निघून गेल्या, दरम्यानच्या काळात शिंदेंचे स्पर्धक राहिलेले नरेंद्र दराडे शिवसेनेत जाऊन आमदारही बनले शिंदे आपले भुजबळ समर्थक म्हणून आहे तिथेच राहिले.
शिंदे यांचे दु:ख वा अपेक्षाभंग असा की, आश्वासन लाभूनही त्यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्वाची संधी मिळाली नाही. एकदा नव्हे तर दोनदा असे झाले. त्यामुळे त्याबाबतची सल त्यांना बोचणे स्वाभाविक आहे. बरे, इकडे भुजबळ परतण्याची शक्यता नाही, आणि पुन्हा परपक्षात जाऊन बंडाचे निशाण फडकवायचे तर, तिथे जागा अगोदरच बुक झालेली. शिंदे यांना भुजबळांनाच विनंती करण्याची वेळ आली ती त्यामुळेच. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, ते भुजबळ समर्थक असतील तर वैयक्तिक विनंती करण्याऐवजी पत्रोपचाराचा प्रदर्शनीपणा करण्याची गरज त्यांना का भासली असावी? भुजबळांना खासगीत भेटून शिंदे आपली इच्छा बोलून दाखवू शकले असते; पण ते ऐकले जाईल याची खात्री नसल्याने व भुजबळांकडून दिले गेलेले आश्वासन पाळले न गेल्याचाच पूर्वानुभव असल्याने शिंदे यांनी आपल्या इच्छेचे जाहीर प्रकटीकरण केले. त्यामुळे ते बदलत्या राजकीय समीकरणात वेगळ्याच संकेतांची नांदी घडविणारे ठरू शकते.
महत्त्वाचे म्हणजे राजकीय वातावरण बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत मागे पडल्याने विरोधी पक्षात म्हणावा तितका त्राण उरलेला दिसत नाही. लोकसभेच्या नाशिकच्या जागेवर भुजबळांना लागोपाठ दुसऱ्यांदा पराभव बघावा लागला आहे. येवल्यात भुजबळांचेच समर्थक राहिलेले दराडे बंधू आता आमदार आहेत त्यांच्यासाठी शिंदे यांनी परिश्रम घेतलेले लपून राहिलेले नाही. मारोतराव पवारही शिवसेनेच्या पाठीशी आहेत. अंबादास बनकर यांनी जणू राजकीय सेवानिवृत्ती घेतली आहे. मग भुजबळांसोबत उरले कोण? अर्थात, एके क करत नेते बाजूला होत असले तरी मतदारांचे बळ मात्र आपल्याच सोबत राखण्यात भुजबळ कसर ठेवणार नाहीत; पण म्हणून बदलत्या समीकरणांकडे त्यांनाही दुर्लक्ष करता येऊ नये. शिंदे यांनी आपले अपेक्षापत्र जाहीर केल्यानंतर भुजबळ यांनी केलेल्या येवला तालुका दौºयात काही ठिकाणी शिंदे समर्थकांनी त्यासंदर्भातली निवेदनेही दिली आहेत. याला बंडाची नांदी भलेही म्हणता येऊ नये; परंतु समर्थक राहून विरोधात वावरणाºयांचे लोण वाढणार असेल तर ते शेजारी पंकज भुजबळ प्रतिनिधित्व करीत असलेल्या नांदगावातही पोहोचू शकते. त्यामुळे राजकीय बांधबंदिस्तीकडे भुजबळांना लक्ष पुरविणे गरजेचे बनले आहे.
 

Web Title:  Bhujbal erupted in fire crackers ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.