भद्रकाली पोलीस ‘स्टार आॅफ मंथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:19 AM2019-04-28T00:19:26+5:302019-04-28T00:20:06+5:30

पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांसाठी दैनंदिन कामकाजाशी संबंधित अकरा मुद्द्यांवर घेण्यात आलेल्या पोलीस आयुक्तांच्या परीक्षेत भद्रकाली पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक पटकाविला.

 Bhadrakali Police 'Star of the Month' | भद्रकाली पोलीस ‘स्टार आॅफ मंथ’

भद्रकाली पोलीस ‘स्टार आॅफ मंथ’

googlenewsNext

नाशिक : पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांसाठी दैनंदिन कामकाजाशी संबंधित अकरा मुद्द्यांवर घेण्यात आलेल्या पोलीस आयुक्तांच्या परीक्षेत भद्रकाली पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक पटकाविला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘स्टार आॅफ द मंथ’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांनी सन्मानचिन्ह देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी व अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील कारभार सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ‘स्टार आॅफ द मंथ’ या योजनेद्वारे पोलीस ठाणेनिहाय गुणांकन व मूल्यांकनासाठी दैनंदिन कामकाजावर आधारित ११ मुद्द्यांवर तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये घटक चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत विविध मुद्द्यांना अनुसरून एकूण ४३०० गुणांची मूल्यांकन पत्रिका तयार करण्यात आली होती. याआधारे भद्रकाली पोलीस ठाण्याचे २०४५ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला, तर पंचवटी पोलीस ठाण्याने द्वितीय क्रमांक राखला आणि नाशिकरोड पोलीस ठाणे तिसरा क्रमांक राखण्यात यशस्वी ठरले.
‘स्टार आॅफ द मंथ’ या योजनेअंतर्गत दर तीन महिन्यांनी पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांसाठी तसेच गुन्हे शाखा, पोलीस मुख्यालय, सायबर पोलीस ठाणे, वाहतूक शाखा यांची परीक्षा घेऊन मूल्यांकन केले जाणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. यासाठी स्वतंत्र समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. अंतर्गत सकारात्मक स्पर्धा वाढीस लागून त्यामुळे दैनंदिन कारभार अधिकाधिक सुधारण्यास मदत होईल, हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात भद्रकाली पोलिसांनी प्रथम विजेता होण्याचा मान पटकाविला आहे. याबद्दल भद्रकाली पोलीस ठाण्याचे कौतुक होत आहे.
अशी आहे मूल्यांकन समिती
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, माधुरी कांगणे, सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आयुक्तालयातील विविध शाखांचे मूल्यांकन उपआयुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील हे करणार आहेत. उत्कृष्ट काम करणाºया पोलीस ठाणे किंवा विशेष शाखेला ‘स्टार आॅप द मंथ’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. असमाधानकारक कामगिरी करणाºया पोलीस ठाणेप्रमुखांना विश्वास-नांगरे पाटील हे स्वत: मार्गदर्शन करणार आहेत.
या अकरा मुद्द्यांवर मूल्यांकन
गंभीर गुन्हे, खुनाचे गुन्हे/चांगली कामगिरी, प्रतिबंधक कारवाई, समन्स बजावणी, वाहतूक, गुन्हे अर्ज निर्गती, मुद्देमाल निर्गती, कायदा-सुव्यवस्था, सीसीटीएनएस कामकाज, दोषसिद्धीप्रमाण, कल्याणकारी प्रशासन या मुद्द्यांच्या आधारे ४३०० गुणांचे मूल्यांकनपत्रिका तयार करून त्यांचे मूल्यांकन करण्यात आले.

Web Title:  Bhadrakali Police 'Star of the Month'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.