सप्तशृंगगड विकासासाठी २५ कोटी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:41 AM2018-07-03T01:41:31+5:302018-07-03T01:42:36+5:30

सप्तशृंगगडावरील शक्तिपीठाकडे जाण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशात पहिल्यांदा तयार करण्यात आलेल्या फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण सोमवारी (दि. २) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 25 crore for development of Saptashringag: Chief Minister Devendra Fadnavis | सप्तशृंगगड विकासासाठी २५ कोटी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्तशृंगगड विकासासाठी २५ कोटी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next

कळवण : सप्तशृंगगडावरील शक्तिपीठाकडे जाण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशात पहिल्यांदा तयार करण्यात आलेल्या फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण सोमवारी (दि. २) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी असल्याचे सांगत सप्तशृंगगड विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.  वणीच्या सप्तशृंगगडावर मे. सुयोग गुरु बक्षाणी फ्यूनिक्युलर रोपवेज, नागपूर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फ्यूनिक्युलर ट्रॉलीच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच त्यांनी फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उद्घाटन करत त्याच ट्रॉलीत प्रवास करत सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार डॉ.राहुल अहेर, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, महिला, दिव्यांग आणि वृद्ध भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुलभ होणार असल्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होत असल्याने त्या भागात रोजगार निर्मिती होते. त्यामुळे भाविकांना चांगली सेवा दिली तर त्याठिकाणी मोठे अर्थकारण व अर्थव्यवस्था उभी राहत असल्याचे सांगून नाशिक जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी मोठी संधी आहे. त्यासाठी शासन सर्व सहकार्य करून भरघोस निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. सप्तशृंगगडावरील आदिवासी डोली व्यावसायिकांना प्रकल्पात समाविष्ट करून घेतल्याने रोजगाराचा प्रश्न सुटला असल्याचे सांगून, या प्रकल्पामुळे बेरोजगार होणाऱ्या बांधवांनाही प्रकल्पात सामावून घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण झालेल्या अडचणी व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा लागला. त्यामुळे लोकार्पण सोहळ्याला उशीर झाल्याचे सांगितले. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी गडाच्या विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करून देत काही प्रकल्पांना मान्यता द्यावी, अशी मागणी केली. वनविभागाची जमीन हस्तांतरित करून गडावरील विकासाला चालना द्यावी व सप्तशृंगगडाच्या विकासासाठी भरघोस निधीची अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक मुख्य अभियंता हेमंत पगारे यांनी, तर सूत्रसंचालन निवेदिका मंगला खाडिलकर यांनी केले. आभार सुरेंद्र कंकरेज यांनी मानले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, आमदार बाळासाहेब सानप, आमदार दीपिका चव्हाण, आमदार नरेंद्र दराडे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती मनीषा पवार,भाजपा नेते वसंत गिते, सुनील बागुल, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. संजय दराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, मुख्य अभियंता हेमंत पगारे, अपर जिल्हाधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
देशातील पहिला प्रयोग असलेला फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी परिश्रम घेणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य सहायक यांच्यासह प्रकल्पाचे खासगी व्यावसायिक मे. सुयोग गुरु बक्षाणी प्रा. लिमिटेड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यात उद्योजक राजू गुरु बक्षाणी, शिवशंकर लातुरे, अधीक्षक अभियंता रणजित हांडे, चंद्रकांत वाघ, प्रकल्प संचालक राजीव लुंबा, सोमनाथ लातुरे, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज, किशोर केदारे, विजय पाटील, विवेक माळुंदे, के. एम. गुंजाळ, एम. बी. राऊत, एस. एन. आंधळे, श्रीमती एस. एम. मोरे, जे. यू. रणदिवे, वाय. पी. मोहिते, आनंद पगारे आदींचा समावेश होता.
भुजबळांची टोलेबाजी
माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले, १९८० साली फॉरेनला गेलो तेव्हा डोंगरकडेनी जाणारी रेल्वे बघितली. डोंगरकपारीत रेल्वे कशी चालते याबाबत माहिती घेतली व तेव्हाच गडावर असे काही करता येईल का? असा विचार समोर आला. गडावर देवीदर्शन सुलभ होण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला. फॉरेस्टच्या जागेवर हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केला. आता नाशिकचा बोट प्रकल्पही तरु ण तडफदार पालकमंत्र्यांनी हाती घ्यावा. मांजरपाडा प्रकल्पाचे उर्वरित कामही मार्गी लावत त्याचे उद्घाटनही तुम्हीच करा, असा उपरोधिक टोलाही भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसमक्ष लगावला. मांजरपाडाचे पाणी कुणीही घ्या, मात्र ते महाराष्ट्रातच वाहू द्या, अशी भूमिकाही भुजबळांनी स्पष्ट केली.

Web Title:  25 crore for development of Saptashringag: Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.