18 corporators charge: In the ten months of BJP rule, only one job is corruption of Rs.22 lakhs in street work | १८ नगरसेवकांचा आरोप : भाजपा सत्तेच्या दहा महिन्यांत केवळ एक काम येवल्यात पथदीपांच्या कामात २२ लाखांचा भ्रष्टाचार
१८ नगरसेवकांचा आरोप : भाजपा सत्तेच्या दहा महिन्यांत केवळ एक काम येवल्यात पथदीपांच्या कामात २२ लाखांचा भ्रष्टाचार

ठळक मुद्देपारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न गुणववा वेशीला टांगली चौकशी करण्याची मागणी

येवला : येवला पालिकेत गेल्या दहा महिन्यांपासून भाजपाच्या सत्ताकाळात नव्याने एलइडी स्ट्रीट लाइट बसविण्याचे ३२ लाख ५० हजार रुपयांचे केवळ एकमेव काम झाले. याकामातही २२ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा सनसनाटी आरोप कागदपत्रे दाखवत राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष अशा १८ नगरसेवकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपाची सत्ता गल्ली ते दिल्ली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्यात पालकमंत्री गिरीश महाजन हे भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी कारभार करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असताना, येवला पालिकेत दिव्याखाली अंधार झाला आहे. येवल्यात एलइडी पथदीप बसविण्याच्या कामात चिनी बनावटीचे दिवे वापरून गुणववा वेशीला टांगली गेली आहे. या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. संकेत शिंदे, शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे व अपक्षांचे गटनेते रुपेश लोणारी यांनी १८ नगरसेवकांच्या उपस्थितीत केली आहे. या प्रकारणी मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे कागदपत्रानिशी तक्र ार दाखल करणार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन शिंदे, प्रवीण बनकर, निसार शेख, शीतल शिंदे, शेख परवीन निसार, रईसा शेख मुश्ताक, शेख तेहसीन, साबीयाबी मो. सलीम, शिवसेनेच्या नगरसेवक सरोजिनी वखारे, छाया देसाई, किरणबाई जावळे, अपक्ष नगरसेवक सचिन मोरे, अमजद शेख, शफीक शेख, पद्मावती शिंदे, उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पुराव्याची कागदपत्रे सादर करतांना आकडेवारी देखील मांडण्यात आली. येवला नगरपालिकेत सत्तांतर होऊन दहा महिने उलटले तरी अद्याप विकासकामांना सुरुवात झाली नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सत्ताकाळातील निधीसह मंजूर असलेली कामे पूर्ण झाली आहे. भाजपा सत्ताकाळातील एलइडी पथदीप बसविण्याचे ३२.५० लाखांचे काम करण्यात आले. याकामाचे १७.५० लाखाचे पहिले बिलही अदा करण्यात आले. सदरचे काम शिर्डी येथील श्री साई कंट्रोल प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले आहे. या कामामध्ये जे एलइडी लाइट बसविण्यात आले आहे ते चिनी बनावटीचे असून, सदर एलइडी दिव्यांची बाजारभावानुसार किंमत १८०० ते २००० रुपये असून, याच कंपनीचे कोटेशन २४०० रुपये दाखविले आहे. येवला नगरपालिकेकरिता मात्र हे दिवे ११७०० रुपये दराने खरेदी करण्यात आले असल्याचे दाखविण्यात आले आहे. याशिवाय खांब व वायर यामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर फरक दिसून येत आहे. तसेच टेंडर प्रोसेसमधील आणि प्रत्यक्षात असलेली लाइट फिटिंगदेखील व्यवस्थित नाही. शहरातील कॉलनी वसाहतीत अंधार कायम आहे. असे असतानादेखील नगर मनमाड रोडवरील पथदीप चालू करण्याचे काम बाकी असताना, तेच काम त्याच ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, ५० लाख रुपयांचे एलइडी लाइट पुन्हा बसविण्याचा घाट घातला आहे.


Web Title: 18 corporators charge: In the ten months of BJP rule, only one job is corruption of Rs.22 lakhs in street work
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.