विधानसभेच्या ‘सेमीफायनल’साठी इच्छुक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 08:29 PM2019-04-01T20:29:56+5:302019-04-04T12:22:19+5:30

अनेकांची चाचपणी : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरण बदलणार

Ready to be interested in the Assembly's 'semi-final' | विधानसभेच्या ‘सेमीफायनल’साठी इच्छुक सज्ज

विधानसभेच्या ‘सेमीफायनल’साठी इच्छुक सज्ज

Next

- रमाकांत पाटील 


नंदुरबार : नंदुरबार लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल हा आजवर कधीच पूरक राहिलेला नाही. मात्र याही परिस्थितीत विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार व विद्यमान आमदार या निवडणुकीत आपापली मोट बांधणीसाठी व मतदारांचा कल अजमावण्यासाठी सज्ज झाले असून ही निवडणूक म्हणजे त्यांच्यासाठी विधानसभेची ‘सेमीफायनल’च राहणार आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील स्थिती पाहता लोकसभेवर भाजपाचे सदस्य असले तरी सहापैकी नवापूर, अक्कलकुवा, शिरपूर व साक्री चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. तर नंदुरबार आणि शहादा या दोन ठिकाणीच भाजपाचे आमदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाला मिळालेले मताधिक्क्य पाहता नवापूर वगळता इतर पाच विधानसभा मतदारसंघात भाजपानेच आघाडी घेतली होती. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपाची चार ठिकाणी पिछेहाट झाली.
या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी व भाजपातर्फे विद्यमान खासदार डॉ.हीना गावीत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सध्या तरी दोन्ही उमेदवारांचा प्रचार वैयक्तिक पातळीवर सुरू आहे. असे असले तरी विद्यमान आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात आपल्या पक्षाचे मताधिक्क्य राखून ठेवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागणार आहे.
नवापुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक हे विद्यमान आमदार असून आगामी निवडणुकीत त्यांचे पुत्र शिरीष नाईक हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणार आहेत. याच उमेदवारीसाठी भरत गावीत हेदेखील स्पर्धेत आहेत. नुकतीच पक्षश्रेष्ठींनी त्यांना बोलवून लोकसभा निवडणुकीचा कानमंत्र दिला आहे. हा मंत्र नेमका कुठल्या स्वरुपाचा आहे तो विधानसभा निवडणुकीच्यावेळीसच त्याचे चित्र समोर येईल. याच मतदारसंघात राज्यात काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी असली तरी काँग्रेसला स्पर्धक उमेदवार राष्टÑवादीचे माजी आमदार शरद गावीत हे राहणार आहेत. अंदर की बात म्हणजे शरद गावीत या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उघड अथवा छुपा प्रचार करू शकतात. काही दिवसात ते चित्रही समोर येईल. त्यामुळे हे इच्छुकदेखील लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेचीच तयारी करणार असल्याचे चित्र आहे.
नंदुरबारमध्ये ज्येष्ठ नेते डॉ.विजयकुमार गावीत हे विद्यमान आमदार आहेत. त्यांची कन्याच भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार असल्याने त्यांना दोन्ही निवडणुकांची तयारी एकाचवेळी करण्याची संधी आहे. ही संधी ते सोडणार नाहीत. त्यांचे प्रतीस्पर्धी काँग्रेसतर्फे कोण उमेदवार राहील याबाबत अद्याप निश्चित नसले तरी गेल्यावेळी निवडणुकीत पराभूत झालेले कुणाल वसावे हेच लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्यासाठीही विधानसभेच्या बांधणीची ही संधी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाला सर्वाधिक म्हणजे ५० हजारापेक्षा अधिक मताधिक्क्य मिळाले होते. या वेळी निवडणूक प्रचारात या मतदारसंघातील काँग्रेसचे प्रभावी नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी हे प्रकृती अस्वस्थतेमुळे प्रचारात नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा जास्त मताधिक्क्य मिळेल की कमी ही बाब विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
शहादा-तळोदा मतदारसंघात भाजपाचे उदेसिंग पाडवी हे विद्यमान आमदार आहेत. त्यांचे आणि गावीत परिवारातील मतभेद लपून राहिलेले नाहीत. नुकतेच त्यांनी भाजपाचाच प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. याच मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसतर्फे राजेंद्रकुमार गावीत व काँग्रेसतर्फे अ‍ॅड.पद्माकर वळवी हे गेल्यावेळी पराभूत झाले होते. या वेळी देखील ते इच्छुक आहेत. याठिकाणी राजकारणाचा तिढा असून गुंतागुंतीचे राजकारण आहे. त्यातून आपापल्या सोयीच्या राजकारणाची मोट या निवडणुकीच्या माध्यमातून तिन्ही उमेदवारांना बांधण्याची संधी आहे.
अक्कलकुवा मतदारसंघात अ‍ॅड.के.सी. पाडवी हे स्वत: विद्यमान आमदार आहेत. ते लोकसभेचेही उमेदवार असल्याने याठिकाणी त्यांना दोन्ही निवडणुकांची तयारी करण्याची संधी आहे. विजयी झाल्यास या मतदारसंघात अ‍ॅड.पद्माकर वळवी यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी दिली जाऊ शकते आणि पराभूत झाल्यास पुन्हा ते उमेदवारी करू शकतात. याशिवाय राष्टÑवादीचे विजयसिंग पराडके, शिवसेनेचे आमशा पाडवी, भाजपातर्फे नागेश पाडवी, माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी असे अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची राहणार आहे.
शिरपूर मतदारसंघात काँग्रेसचे काशीराम पावरा हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघाची धुरा स्वत: आमदार अमरिशभाई पटेल यांच्याकडे असते. गेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघाचे ते स्वत: उमेदवार असल्याने त्यावेळी ते प्रचाराला नव्हते. त्यामुळे याठिकाणी भाजपाला लोकसभेत ४९ हजाराचे मताधिक्क्य मिळाले होते. या वेळी मात्र ते स्वत: काँग्रेसचा प्रचार करणार असल्याने या वेळी काँग्रेसला मताधिक्क्य मिळणार की पुन्हा भाजपाला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साक्री मतदारसंघात काँग्रेसचे डी.एस. अहिरे हे विद्यमान आमदार आहेत. तसेच याठिकाणी भाजपाच्या मंजुळाबाई गावीत या पराभूत झाल्या होत्या. आता भाजपाच्या इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे.
एकूणच लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेच्या तयारीसाठी सर्वच इच्छुक उमेदवार सज्ज झाले असून आपापल्या कार्यकर्त्यांची बांधणी व रणनीती आखण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

Web Title: Ready to be interested in the Assembly's 'semi-final'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.