Nandurbar chilli split low, crisis due to disease | नंदुरबारच्या मिरचीचा ठसका झाला कमी!, रोगामुळे संकट

रमाकांत पाटील 
नंदुरबार : मिरचीचे आगार असलेल्या नंदुरबारमध्ये विविध कारणांनी उत्पादन घटत आहे. परराज्यातील मिरचीने येथे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे एकप्रकारे नंदुरबारच्या मिरचीचा ठसका कमी झाला आहे.
१० वर्षापूर्वी येथील बाजारपेठेत हंगामात रोज पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची विक्रीसाठी येत होती. व्यापाºयांनी खरेदी केलेली ओली मिरची सुकवण्यासाठी शेकडो एकर जागेवर पथाºया होत्या. लालजर्द मिरचीने सजलेल्या पथाºया सर्वांचेच आकर्षण ठरत असे. आता मात्र चित्र बदलले आहे. पाच-सात वर्षांपासून मिरची उत्पादक शेतकरी इतर बागायती पिकांकडे वळले आहेत. रोगराईमुळे घटणारे उत्पन्न आणि त्यातच अस्थिर भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे उत्पादक संकटात सापडला आहे. परिणामी मिरची लागवडीचे क्षेत्रही घटत चालले आहे.
पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड असलेले मिरचीचे क्षेत्र यंदा केवळ १,६०० हेक्टरवर आले आहे. त्यातच यावर्षी मिरचीवर घुबडा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने अपेक्षित वाढही झाली नाही. परिणामी उत्पन्न घटले.
अनेक शेतकºयांनी मिरचीचे पीक काढून गहू आणि हरभºयाची पेरणी केली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये नंदुरबार बाजार समितीत रोज तीन ते सहा हजार क्विंटल मिरचीची आवक होती. आज ती केवळ ५०० ते ६०० क्विंटलवर आली आहे. सध्या जेमतेम ३० ते ४० वाहने येत असून त्यातही मध्य प्रदेशातील वाहनांचा समावेश अधिक आहे.
गेल्या काही वर्षापासून येथील मिरची, मसाले उत्पादक गुंटूर व वारंगळ येथून मिरची मागवत आहेत. मात्र तेथील मिरचीचा हंगाम उशिरा असल्याने ही मिरची बाजारपेठेत यायला किमान १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नंदुरबार येथील मिरचीच्या ख्यातीमुळे ‘चिली पार्क’ सुरू करण्याच्या घोषणा अनेक वर्षांपासून होत आहेत. प्रत्यक्षात त्याबाबत कुठलीही कार्यवाही होत नाही. शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मिरची निर्यातीचे केंद्र सुरूझाल्यास उत्पादनही वाढेल आणि शेतकºयांना भावही मिळेल.
नंदुरबार बाजार समितीत सध्या मिरचीची आवक प्रचंड घटली आहे. मिरचीवर रोग पडल्याने अनेक शेतकºयांनी पीक काढले. त्यामुळे सध्या बाजारपेठेत जेमतेम आवक असून त्याचा दर्जाही समाधानकारक नाही. आंध्र प्रदेश व कर्नाटकमधील मिरचीवर उद्योजकांना अवलंबून रहावे लागणार आहे.
- जयेशकुमार कोचर,
मिरची उद्योजक, नंदुरबार.