‘भगर’ने दिला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:09 PM2018-05-27T13:09:37+5:302018-05-27T13:09:37+5:30

चकल्या, लाडू, पापडसह खाद्यपदार्थांची निर्मिती

Employment by 'bhaggar' | ‘भगर’ने दिला रोजगार

‘भगर’ने दिला रोजगार

Next

रमाकांत पाटील / आॅनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. २७ - सातपुड्यातील डोंगराळ भागात असलेल्या चढउताराच्या, हलक्या व पाण्याची पुरेशी व्यवस्था नसलेल्या जमिनीत पारंपरिक भगर हे पीक तेथील आदिवासी घेतात. अर्थातच या पिकाला पर्वतीय पीक म्हणून ओळखले जाते. त्या भागातील आदिवासी भादी, बंटी, मोर या नावाने ओळखतात. जवळपास प्रत्येक कुटुंब आपल्याकडे असलेल्या थोड्याफार जमिनीत हे पीक हमखासपणे घेतात.
सातपुडा नैसर्गिक भगरची भुरळ
सातपुड्यातील पारंपरिक पीक म्हणून ओळखले जाणारे ‘भगर’ या धान्याने कात टाकून नव्या रूपात पदार्पण केले असून हे धान्य आता तेथील आदिवासींचे उत्पन्नाचे साधन होऊ लागले आहे. भगर काढणीच्या व्यवसायानेही अनेक महिलांना आधार दिला आहे.
वर्षातून साधारणत: दोनवेळादेखील हे पीक घेतले जाते. मात्र हे ते या भागातील आदिवासींनी स्वत:च्या स्वयंपाकगृहापर्यंतच मर्यादित ठेवले होते. अनेक आदिवासी कुटुंबांकडे या पिकाचे उत्पन्न अधिक आल्यास त्याचे ते कणगीत साठवण करून ठेवतात.
कृषी विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थांनी सातपुड्यातील पारंपरिक भगर या पिकाचा अभ्यास करून हेच पीक आदिवासींचे उत्पन्नाचे साधन व महिलांना रोजगाराचे साधन बनवून देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांना यशही मिळू लागले असून सातपुड्यातील हेच भगर आता बाहेरील लोकांना ‘नैसर्गिक भगर’ म्हणून भुरळ घालत आहे. नव्हे तर भगरपासून चकल्या, लाडू, पापड, शेवया व इतर खाद्यपदार्थही बनविले जात आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडळाने यासंदर्भातील १५ गावांसाठी एक प्रकल्पही तयार केला असून त्यात जवळपास ८५ बचत गट कार्यान्वित आहेत. या बचत गटांतील ९०० महिला या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. या १५ गावात जवळपास ३२५ एकर क्षेत्रात भगरचे पीक घेतले जात असून भगर काढणीसाठी स्वतंत्र कारखाना महिलांनीच सुरू केला आहे.

परिसरातील ९०० महिला भगरचे उत्पादन घेत असून त्या भगरच्या काढणीसाठी कारखाना कार्यान्वित आहे. याठिकाणी महिन्याला पाच ते १० क्विंटल भगर काढणी केली जाते. याबाबत मदुराई (तामिळनाडू) येथे उपपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन ते बनविण्यास सुरुवात केली असून यातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
- रमिला वळवी, राणीकाजल लोकसंचलित साधन केंद्र, मोलगी

या भागातील आदिवासी पूर्वी पारंपरिक पद्धतीने भगरची लागवड करीत होते. त्यांना मार्गदर्शन करून त्यात आधुनिकता आणल्याने उत्पन्न वाढले आहे. शिवाय भगर तयार करण्यासाठी लागणारे श्रम कमी करून पक्की भगर निर्मितीसाठी होणाऱ्या तुटीतही घट करण्यात आली आहे. त्यामुळे भगर हे आता आदिवासींचे उदरनिर्वाहाचे साधनही बनत आहे.
-राजेंद्र दहातोंडे, समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, कोळदे

Web Title: Employment by 'bhaggar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.