आष्टीत योगेशचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; नॅशनल स्टुडंटस् अँड युथ फ्रंटच्या कमिटीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 03:16 PM2018-01-15T15:16:38+5:302018-01-15T16:14:04+5:30

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान हदगाव तालुक्यातील आष्टी येथील योगेश प्रल्हाद जाधव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. याबाबत नॅशनल एससी, एसटी, ओबीसी, स्टुडंटस् अँड युथ फ्रंटच्या सात सदस्यीय समितीने योगेशचा मृत्यू पोलिसांच्या लाठी हल्ल्यातच झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.

Yogesh's death in the custody of police; National Student and Youth Front Committee's report | आष्टीत योगेशचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; नॅशनल स्टुडंटस् अँड युथ फ्रंटच्या कमिटीचा अहवाल

आष्टीत योगेशचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; नॅशनल स्टुडंटस् अँड युथ फ्रंटच्या कमिटीचा अहवाल

googlenewsNext

नांदेड : कोरेगाव भीमा प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान हदगाव तालुक्यातील आष्टी येथील योगेश प्रल्हाद जाधव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. याबाबत नॅशनल एससी, एसटी, ओबीसी, स्टुडंटस् अँड युथ फ्रंटच्या सात सदस्यीय समितीने योगेशचा मृत्यू पोलिसांच्या लाठी हल्ल्यातच झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.

एनएसओएसवायएफ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन दवणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़ संघटनेने डेथ फॅक्च्युअ‍ॅलिटी आॅफ योगेश जाधव ही सात सदस्यीय समिती ७ जानेवारी रोजी गठीत करून या प्रकरणाची चौकशी केली़ ९ जानेवारी रोजी आष्टी गावात गावकर्‍यांशी तसेच पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा करून हा अहवाल देण्यात आला आहे़ ३ जानेवारी रोजी आष्टीमध्ये सर्वत्र शांततेचे वातावरण असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक खान यांच्या नेतृत्वाखालील पथकातील एका पोलिस कर्मचार्‍याने चालत्या गाडीतून योगेशच्या डोक्यात काठीने मारले़ यात तो गंभीर जखमी झाला़ जखमी अवस्थेत त्याला प्रारंभी आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, त्यानंतर हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले़ प्रकृती गंभीर असल्याने त्याला नांदेडला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला़ नांदेडला आणत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

योगेशचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाल्याचे स्पष्ट आहे़ असे असतांनाही पोलिस अधीक्षक व इतर पोलिस अधिकार्‍यांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. योगेशचे वडील प्रल्हाद जाधव यांनी या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार हदगाव ठाण्यात दिली़ या तक्रारीवरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही़  या समितीत बालाजी कोंडामंगल, रवि सूर्यवंशी, स्वप्निल नरबाग, प्रा.सतीश वागरे, संघरत्न निवडंगे, मंगेश गाडगे, अ‍ॅड़ अस्मिता वाघमारे यांचा समावेश होता़ 

१७ जानेवारीस कॅन्डल मार्च
एनएसओएसवायएफ संघटनेचा हा अहवाल जिल्हाधिकार्‍यामार्फत केंद्रीय गृहमंत्री, राज्य गृहमंत्री, खा.डॉ.उदीतराज, हिंगोलीचे खा.राजीव सातव, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस महानिरीक्षकांना दिल्याचे संघटनेचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले़ दरम्यान, संघटनेच्या वतीने १७ जानेवारी रोजी शहरातून कॅन्डल मार्चही काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ 

कायदेशीर लढा देण्यात येणार

या प्रकरणात पोलिसांविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करावा, मयत योगेश जाधव हा अनुसूचित जातीतील बौद्ध समाजाचा आहे़ दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील तो असून वडील भूमिहीन शेतमजूर आहेत़ कुटुंबाचे दारिद्रय योगेशच्या शिक्षणातून संपुष्टात येईल असे स्वप्न जाधव कुटुंबियाचे होते़ ते त्याच्या मृत्यूने भंग पावले आहे़ परिणामी जाधव कुटुंबियांना २५ लाखांची मदत करावी, तसेच योगेशचा भाऊ विशाल जाधव याला सज्ञान झाल्यानंतर शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी या समितीने केली आहे़  या मृत्यूप्रकरणी संघटनेच्या वतीने कायदेशीर लढा देण्यात येणार आहे़ याबरोबरच रस्त्यावरची लढाई ही सुरूच राहील, असा इशाराही डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिला़ 

Web Title: Yogesh's death in the custody of police; National Student and Youth Front Committee's report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.