नागपुरात दोन ठिकाणी गुंडांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 08:28 PM2019-03-23T20:28:45+5:302019-03-23T20:35:59+5:30

विविध ठिकाणी दोन गुंडांच्या हत्येच्या घटना घडल्या. क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या दोन साथीदारांनी अजनीत एका गुंडाची निर्घृण हत्या केली. तर, दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यामुळे वाद झाल्याने एका तरुणाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुंडाला सिमेंट रोडवर ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला.

Two murders of goons in Nagpur | नागपुरात दोन ठिकाणी गुंडांची हत्या

नागपुरात दोन ठिकाणी गुंडांची हत्या

Next
ठळक मुद्देअजनीत आणि गणेशपेठ भागात थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध ठिकाणी दोन गुंडांच्या हत्येच्या घटना घडल्या. क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या दोन साथीदारांनी अजनीत एका गुंडाची निर्घृण हत्या केली. तर, दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यामुळे वाद झाल्याने एका तरुणाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुंडाला सिमेंट रोडवर ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला.
अजनीतील काशीनगर रिंगरोडवरील रहिवासी असलेला बुद्धराम ऊर्फ कल्लू कलेश्वर कैथवास (वय ५०) गेल्या काही दिवसांपासून बेसा चौक मार्गावरच्या फुलमती लेआऊटमध्ये टिनाच्या शेडमध्ये राहत होता. त्याने या भागातील काही भूखंडांवर झोपडे टाकून अनधिकृत कब्जा करून ठेवला होता. या एकेका भूखंडाची किंमत लाखो रुपये आहे. त्याच्यासोबत पहिल्या पत्नीचे (वय ४५) वितुष्ट आले होते. तो आता या ठिकाणी दुसऱ्या पत्नीसोबत (वय २२) राहत होता. काही दिवसांपूर्वी कल्लूने मनीषनगरातील एक भूखंड विकला होता. त्यातून त्याला लाखो रुपये मिळाले होते. त्या पैशातून कल्लूने एक ऑटो खरेदी केला होता. कल्लूने याच लेआऊटमध्ये दोन-तीन झोपडे टाकून ठेवले होते. त्याने बाजूच्या झोपड्यात प्रशील सुरेश डुकरे याला ठेवले होते. प्रशील मूळचा वर्धा जिल्ह्यातील चिंचाळा (ता. देवळी) येथील रहिवासी होय. प्रशीलकडून कल्लू नोकरासारखे काम करून घ्यायचा. कल्लूची दुसरी पत्नी तिच्या माहेरी गेली होती. शुक्रवारी तो एकटाच घरी होता. सायंकाळी ५.३० च्या सुमारास पत्नीला रुग्णालयात न्यायचे आहे, असे सांगून प्रशीलने कल्लूचा ऑटो नेला. रात्र झाली तरी तो परतला नाही त्यामुळे कल्लू संतप्त झाला. त्याने प्रशीलला फोनवरून घाणेरडी शिवीगाळ केली. रात्री ८ च्या सुमारास प्रशील ऑटो घेऊन गेला तेव्हाही कल्लूने त्याला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे प्रशील कमालीचा क्षुब्ध झाला. त्याने त्याचा मित्र (ऑटोचालक) बादल वसंतराव प्रधान (वय २४, रा. फुलमती लेआऊट) याला सोबत घेतले. हे दोघे रात्री ११.३० च्या सुमारास कल्लूच्या झोपड्यावर आले. एकाने उशीने कल्लूचे नाक-तोंड दाबले तर दुसऱ्याने कल्लूचा चाकूने गळा कापून त्याची हत्या केली. यानंतर कल्लूचा मृतदेह फरफटत बाहेर आणला. त्याच्या पायाला दगड बांधला आणि मृतदेह बाजूच्या विहिरीत फेकून दिला. आरोपींनी चाकूही विहिरीत टाकला आणि पळून गेले.
असा झाला उलगडा
या संबंधाने गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, भावाचा अपघात झाल्यामुळे ऑटो घेण्यासाठी कल्लूची दुसरी पत्नी शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घरी परतली. तेव्हा तिला घरात रक्ताचा सडा दिसला. त्यामुळे तिने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नियंत्रण कक्षात माहिती दिली. त्यानुसार, अजनी तसेच गुन्हे शाखेची पोलीस पथके घटनास्थळी पोहचली. घरातून फरफटत विहिरीजवळ नेल्याचे दिसत असल्याने पोलिसांनी विहिरीत डोकावले असता विहिरीच्या मधल्या फळीवर कल्लूचा मृतदेह पोलिसांना अडकून दिसला. अग्निशमन दलाच्या मदतीने पोलिसांनी तो बाहेर काढला. मृत कल्लूच्या पायाला दगड बांधला होता. मृतदेह विहिरीच्या पाण्यात फेकला की तो दगडामुळे वर येणार नाही, असा आरोपींचा कयास होता. मात्र, अंधार आणि घाईगडबडीत कल्लूचा मृतदेह विहिरीतील फळीला अडकून राहिला तो पाण्यात पडलाच नाही. दुसरीकडे आरोपींनी घरातील रक्ताचे डाग, फरफटण्याच्या खुणाही जशाच्या तशा ठेवल्या. दरम्यान, ही माहिती कळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, परिमंडळ चारचे उपायुक्त राजतिलक रोशन आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी कल्लूच्या दुसऱ्या पत्नीला विचारपूस केली असता तिने घटनाक्रम माहीत नसल्याचे सांगून बादल तसेच प्रशील सोबत राहत होते, अशी माहिती दिली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच या दोघांची शोधाशोध केली. त्यांच्या घरी चौकशी केली असता त्यांचे कपडे रक्ताने माखल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले. बादल आणि प्रशीलने लगेच हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली. अजनी पोलीस ठाण्यात कल्लूचा मोठा भाऊ रामअजोर कलेश्वर कैथवास (रा. काशीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बादल तसेच प्रशीलविरुद्ध हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दारूच्या बाटल्या अन् पत्ते
कल्लूने ऑटो परत करण्यासाठी उशीर झाल्यामुळे घाणेरड्या शिव्या दिल्याने त्याचा गेम केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. मात्र, यामागे दुसरे कोणते कारण असावे, असा संशय आहे. मृत कल्लू गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याने अनेकांच्या भूखंडावर कब्जा मारला होता, असा मुद्दा पत्रकार परिषदेत उपस्थित झाला, त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे उपायुक्त भरणे म्हणाले.
या ठिकाणी मोठा जुगार अड्डा भरत होता. लाखोंची हार-जित व्हायची, असे पत्रकारांनी सांगितले असता ते स्पष्ट झाले नाही. मात्र ताशपत्ते आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या तेथे सापडल्याचे उपायुक्त भरणे यांनी मान्य केले. कल्लूकडे मोठी रक्कम होती, ती कुठे आहे, एकाने शिव्या दिल्या, मात्र दुसरा लगेच हत्येसारखा गुन्हा करायला कसा तयार झाला, असे अनेक प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यावर बोलताना आम्ही या प्रकरणात कारण आणि आणखी काही आरोपी आहेत काय, त्याची चौकशी करीत असल्याचे उपायुक्त भरणे यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रकार परिषदेला सहायक आयुक्त सुधीर नंदनवार तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने उपस्थित होते. गुन्ह्याचा अवघ्या काही तासात उलगडा करून आरोपींच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी सहायक निरीक्षक दिलीप चंदन, किरण चौगुले, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, सुरेश हावरे, एएसआय रमेश उमाठे, हवालदार बट्टूलाल पांडे, नृसिंग दमाहे, सतीश मेश्राम, सुधाकर धंदर, देवेंद्र चव्हाण, अजय रोडे, शिपाई रवींद्र राऊत, बबन राऊत, आशिष क्षीरसागर, सतीश निमजे, सचिन तुमसरे, अविनाश ठाकूर, गोविंद देशमुख, ज्ञानेश्वर तांदुळकर, दीपक झाडे आणि राजेंद्र तिवारी आदींनी बजावली.

ढेंगेची हत्या दारूच्या वादातून
कर्नलबाग, हनुमान मंदिराजवळ राहणारा अविनाश सीताराम ढेंगे (वय ६०) याची हत्या दारूच्या वादातून झाल्याचे उघड झाले आहे. पाचपावलीतील कुख्यात गुंड म्हणून काही वर्षांपूर्वी ढेंगेची मोठी दहशत होती.
बुधवारी मध्यरात्री ढेंगे याने अमोल ऊर्फ भुऱ्या खरसडे (वय २३, रा. पारडी) याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. भुऱ्याने नकार देताच ढेंगे त्याला शिवीगाळ करू लागला. त्याने विरोध केल्याने या दोघांमध्ये हाणामारी झाली. रागाच्या भरात भुऱ्याने ढेंगेला ढकलून दिले, त्यामुळे तो सिमेंट रोडवर पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ढेंगे मृत झाला. हा घटनाक्रम उघड झाल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी भुऱ्याला अटक केली.

Web Title: Two murders of goons in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.