Two crores fund to Kandahar taluka for toilets, 17 toilets in the village will be completed | पाणंदमुक्तीसाठी कंधार तालुक्याला दोन कोटींचा निधी; १७ गावांतील शौचालये पूर्ण होणार
पाणंदमुक्तीसाठी कंधार तालुक्याला दोन कोटींचा निधी; १७ गावांतील शौचालये पूर्ण होणार

नांदेड : कंधार तालुका पाणंदमुक्तीचा मुहूर्त साधण्यासाठी सातत्याने निधीचा अडसर ठरत आहे़ ‘लोकमत’ दोन महिन्यांपासून हा प्रश्न ऐरणीवर आणत आहे़ निधी अपुरा मिळत असल्याने शौचालय बांधकाम अडचणीत आल्याने पाणंदमुक्तीचे स्वप्न मृगजळ ठरण्याची भीती निर्माण झाल्याचे चित्र समोर आले़ २५ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने बांधकामासाठी ग्रामपंचायतीचा निधी वापरात आणल्याचे वृत्त प्रकाशित केले़ आणि ३ फेब्रुवारी रोजी दोन कोटी उपलब्ध झाले़ त्यातून १७ गावे पाणंदमुक्त व उर्वरित गावांत पहिला अग्रीम हप्ता देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समोर आले आहे़ 

तालुक्यात ११६ ग्रामपंचायती असून तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी पं़स़ स्तरावरून विविध टप्पे करत मोठी मोहीम राबविण्यात आली़ दुष्काळी स्थिती, खरीप हंगाम कामे, आर्थिक अडचण असूनही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला़ शौचालय बांधकामांना अग्रक्रम दिला़ त्यातून ५३ गावे पाणंदमुक्त होण्यास मदत झाली़, परंतु सातत्याने निधीची वाणवा असल्याने पाणंदमुक्तीला आडकाठी येत असल्याचे चित्र समोर आले असून स्वच्छता चळवळीला ब्रेक लागत  होते. ‘लोकमत’ने डिसेंबर व जानेवारी महिन्यात निधीच्या तुटवड्याचा प्रश्न ऐरणीवर आणला़ शौचालय बांधकाम करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून ग्रामपंचायतीचा निधी वापर करण्याचे सूचित करण्यात आले़ २५ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने पुन्हा ही बाब समोर आणली़

शौचालय बांधकामासाठी ३ फेब्रुवारी रोजी २ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचे समजते़ १ कोटी निधीतून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोजकेच बांधकामे (१०० च्या आत) शिल्लक आहेत़ अशा १७ गावांत वापरला जाणार आहे़ त्यामुळे गाव तात्काळ पाणंदमुक्त होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे़ त्यात तळ्याची वाडी १३, शिर्सी बु़ ३४, बोळका ५०, कौठा ५१, बोरी खु़ ५५, मानसिंग वाडी ६०, रामानाईक तांडा ६२, संगुची वाडी ६५, दाताळा ६७, धर्मापुरी मजरे ६७, दैठणा ६९, आलेगाव ७३, पोखर्णी ७३, उमरगा खो़ ८०, हिप्परगा (शहा) ८४, नारनाळी ९५, कंधारेवाडी ९६ अशी एकूण १७ गाावे पाणंदमुक्त होणार आहेत़

अखेर निधी मिळाला
एका कोटीतून ४६ गावांतील शिल्लक शौचालय बांधकाम करण्यासाठी अग्रीम दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले़, परंतु निधीचे २५०० ते २६०० प्रस्ताव पडून असल्याचे समजते़ त्यांना निधी वितरण कसा होणार? हा प्रश्न निर्माण झाला असून लाभार्थ्यांत असंतोष पसरला आहे़ 


Web Title: Two crores fund to Kandahar taluka for toilets, 17 toilets in the village will be completed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.