Truck hits two-wheeler; One killed | ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार
ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार

ठळक मुद्देमॉर्निंग वॉकला गेलेल्या युवकाला बोलेरोची धडक

लोहा : सोनखेड येथील बाजारहाट व खाजगी कामे आटोपून पिता-पुत्र मोटारसायकलने डेरला गावी जात असताना नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी पाटीनजीक भरधाव वेगातील ट्रकने मोटारसायकलीस दिलेल्या जबर धडकेत पिता जागीच ठार तर पुत्र जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली़
लोहा तालुक्यातील डेरला येथील संभाजी गंगाराम सालकमवाड (वय ६०) व रामकिशन संभाजी सालकमवाड (३०) हे दोघे पिता-पुत्र बाजार व खाजगी कामानिमित्त सोनखेडला आले होते़ दोघेही पिता-पुत्र मोटारसायकल (एम़एच़ २६ ई- ९४१८) ने डेरला या गावी जाण्यासाठी निघाले असता मोटारसायकल नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी पाटीनजीक येताच नांदेड वरून लातूरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहू ट्रक (क्र. एम़एच़ २४, ८७९५) ने समोरून येणाºया मोटारसायकलीस जबर धडक दिली. धडकेने मोटारसायकलवरील पाठीमागे बसलेले पिता संभाजी सालकमवाड उडून रस्त्यावर पडले असता त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर मुलगा रामकिशन सालकमवाड जखमी झाला.
त्याच्यावर नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सोनखेड ठाण्याचे सपोनि बालाजी बंडे, पोलीस नाईक प्रकाश साखरे, पोकॉ. गुरूनाथ कारामुंगे, राजेश मुंडे यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. मात्र, सोनखेड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी सोनखेड पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या युवकाला बोलेरोची धडक
राज्य महामार्गाच्या कडेने मॉर्निंग वॉकसाठी जात असताना पाठीमागून गाडीने दिलेल्या धडकेने कासराळीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष हणमंत हायगले हे जागीच ठार झाले आहेत. हणमंत विठ्ठलराव हायगले हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे नरसी मार्गाकडे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना कासराळी आणि पाचपिंपळीदरम्यान नरसीकडेच जाणा-या (एमएच-२६-बीई २८६३) या बोलेरो पिकअप गाडीने हायगले यांना पाठीमागून जोराची धडक दिली.या अपघातात हणमंत हायगले (वय ४५) हे जागीच ठार झाले. या रस्त्यादरम्यान मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या हायगले यांच्या सहका-यांनी बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच हायगले गतप्राण झाले होते. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.


Web Title: Truck hits two-wheeler; One killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.