A traffic branch of Nanded landed on the road | नांदेडात वाहतूक शाखाच उतरली रस्त्यावर
नांदेडात वाहतूक शाखाच उतरली रस्त्यावर

ठळक मुद्देमहापालिका प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत

नांदेड : शहरातील फुटपाथवर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे पादचारी मुख्य रस्त्याचा वापर करीत आहेत़ त्याचबरोबर या दुकानासमोरच वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने शहर वाहतूक शाखेने अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम सुरु केली आहे़ विशेष म्हणजे, यापूर्वीही शहर वाहतूक शाखेकडून अशाचप्रकारची मोहीम सुरु असताना मनपा प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत होते़
शहरात वाहतूक कोंडीची नित्याचीच झाली आहे़ अरुंद रस्ते आणि वाढत जाणारी वाहनांची संख्या यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ त्यात मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यावर वाहने पार्कींगसाठी जागाच नसल्यामुळे नागरिक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात़ त्यामुळे वर्कशॉप कॉर्नर ते जुना मोंढा या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होतो़ या मुख्य रस्त्यावर असलेल्या फूटपाथवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे़ त्यामुळे नागरिक चालण्यासाठी मुख्य रस्त्याचाच वापर करतात़
फूटपाथवरील हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात शहर वाहतूक शाखेकडून मनपाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात येतो़ परंतु, प्रत्येकवेळी मनपा प्रशासनाकडून या पत्राला केराची टोपली दाखविली जाते़
त्यामुळे शहर वाहतूक शाखेला ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेत स्वत:च अतिक्रमण हटवावे लागते़ शुक्रवारी वाहतूक शाखेचे पोनि़चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद भागातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्यात आले़ यावेळी विक्रेत्यांचे साहित्यही जप्त करण्यात आले़ परंतु, कारवाईला तासभर लोटताच पुन्हा विक्रेत्यांनी त्याच ठिकाणी दुकाने थाटली, हे विशेष!
वाहतूक शाखेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मोहिमेला महापालिकेनेही प्रतिसाद देण्याची गरज आहे़


Web Title: A traffic branch of Nanded landed on the road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.