Summertime increased | उन्हाचा पारा वाढला
उन्हाचा पारा वाढला

ठळक मुद्देउन्हातील शाळांमुळे विद्यार्थ्यांचे बेहाल

बिलोली : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे़ उन्हाचे चटके सहन करीत खाजगी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. दुपारच्या सत्रातील शाळांमुळे विद्यार्थ्यांचे बेहाल होत असल्याने पालकांनी या शाळा सकाळी भरविण्याची मागणी केली आहे़
उन्हाळ्याच्या झळा चिमुकल्या मुलांना सोसाव्या लागत असल्याने पालकांची कोंडी झाली आहे़ एकीकडे पारा वाढत असताना सुरु असलेल्या शाळा चिमुकल्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
मार्च महिना मध्यावर असताना पारा ३७, ३८ अंशाच्या वर गेल्याने मे महिन्यात काय स्थिती राहणार असेल, याची कल्पना येवू शकते. सातत्याने वाढणारे ऊन आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. उन्हापासून काळजी न घेतल्यास धोकाही संभवू शकतो. या सर्व परिस्थितीची जाणीव असतानाही तालुक्यातील इंग्रजी खाजगी शाळा मात्र सर्रास सुरु आहेत. तालुक्यात ९ इंग्रजी खाजगी शाळा असून विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे़
विशेष करुन, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आजही चिमुकल्यांना नाईलाजास्तव जावे लागत आहे. वाढते ऊन पाहता जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत शाळा संपविल्या जातात.मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळा दुपारी १२ ते २ या दरम्यान सोडल्या जात असल्याने भर उन्हात सूर्य आग ओकत असताना विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जावे लगत आहे. या उन्हाचे दुष्परिणाम बऱ्याच विद्यार्थांना जाणवू लागले आहे. या शाळा अजूनही काही दिवस सुरु राहणार असल्याचे समजते.
विद्यार्थ्यांचा त्रास लक्षात घेवून नियोजन करावे
इंग्रजी शाळांना सुट्या देण्याच्या संदर्भात शासन आदेश नसल्याचे यासंदर्भात अधिकारी सांगतात. मात्र, भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, स्थानिक पातळीवर विद्यार्थी हिताचे निर्णय घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आज मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक भरउन्हात विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असले तरी, बऱ्याच पालकांना विद्यार्र्थ्यांचीही उन्हाळ्यातील शाळा त्रासदायक ठरत आहे़
सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याची मागणी
माझी मुलगी बिलोलीच्या इंग्रजी शाळेत पहिल्या वर्गात शिकत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला असल्याकारणाने जि.प.च्या शाळेप्रमाणे इंग्रजी शाळाही सकाळच्या सत्रात घेण्यात याव्यात़ जेणेकरुन चिमुकल्यांना उन्हाचा त्रास होणार नाही़ यावर्षी उन्हासोबतच दुष्काळाचे चटके सहन करावे लागणार आहेत़ या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाने विचार करणे गरजेचे आहे़ -रामदास उडतलवार, पालक, हिंगणी़


Web Title: Summertime increased
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.