Student's molestation case registered against teacher at Nanded | विद्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणी नांदेड येथे शिक्षकावर गुन्हा दाखल 

ठळक मुद्देराजर्षी शाहू विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील एका शिक्षकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली होती़त्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी शिक्षकाला बेदम मारहाण केली.

नांदेड : शहरातील आनंदनगर भागात असलेल्या राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील एका शिक्षकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली होती़ त्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी शिक्षकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी सोमवारी रात्री शिक्षकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणात शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

राजर्षी शाहू विद्यालयात राजकुमार हाणमंत पवार या शिक्षकाने एका नववीतील विद्यार्थीनीला मराठीचे पुस्तक देण्याचा बहाणा करुन एका खोलीत नेले़ या ठिकाणी पवार याने त्या विद्यार्थीनीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली़ यावेळी विद्यार्थीनीने विरोध केल्यानंतर तीला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली़ ही बाब महिन्याभरापूर्वी घडली होती़ त्यावेळी विद्यार्थीनीने शिक्षकाच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली होती. परंतु; त्यानंतरही शिक्षकाकडून विद्यार्थीनीला त्रास देण्यात येत होता. ही बाब कुटुंबियांना कळाल्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी  दुपारी पिडीत विद्यार्थीनीचे नातेवाईक शाळेत आले़ यावेळी त्यांनी शिक्षक राजकुमार पवार याला जाब विचारत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली होती. अचानक उडालेल्या या गोंधळामुळे शाळेत पळापळ झाली. 

यानंतर कर्मचा-यांनी संतप्त नातेवाईकांच्या तावडीतून शिक्षकाची सुटका करून त्यास स्टाफरूममध्ये नेले. यावेळी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी शिक्षकास ताब्यात घेतले. परंतु; या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. याबाबत पिडीत विद्यार्थीनीने सोमवारी रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली़ त्यानुसार शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अटकही करण्यात आली आहे.