पाण्यावर १५ दिवस पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:40 AM2019-06-16T00:40:23+5:302019-06-16T00:42:13+5:30

शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर आणखी १५ दिवस पोलिसांसह महापालिका, पाटबंधारे विभागाच्या पथकांचा पहारा राहणार आहे.

security appointed the water for 15 days | पाण्यावर १५ दिवस पहारा

पाण्यावर १५ दिवस पहारा

Next
ठळक मुद्देविष्णूपुरीतील मृत जलसाठ्यात झाली चार इंचाची वाढसिद्धेश्वरमधून आतापर्यंत १५ पैकी ५ दलघमी पाणी सोडले

नांदेड : शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर आणखी १५ दिवस पोलिसांसह महापालिका, पाटबंधारे विभागाच्या पथकांचा पहारा राहणार आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी तीन वाजेपासून विष्णूपुरीत दाखल झालेल्या पाण्यामुळे मृत जलसाठ्यात चार इंचाची वाढ झाली आहे.
वसमतपासून पाण्यावर या पथकांची नजर राहणार आहे. वसमत, औंढा आणि नांदेड अशा तीन विभागांत पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांनी सिद्धेश्वर धरणातून नांदेडपर्यंत येणाऱ्या पाण्याचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता एस. बी. बिराजदार, बी. डी. भालेराव, कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, महापालिकेचे उपायुक्त विलास भोसीकर, उपअभियंता संघरत्न सोनसळे, अविनाश अटकोरे, रमेश चौरे, सदाशिव पतंगे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, सिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरी प्रकल्पात सोडण्यात येणा-या १५ पैकी ५ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. आणखी १० दलघमी पाणी सोडणे शिल्लक आहे. हे पाणी सोडले जात आहे. पाण्याचा अवैध उपसा होऊ नये, पाण्याची चोरी होऊ नये यासाठी पथकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे. पोलिसांचीही स्वतंत्र पथके राहणार आहेत. दरम्यान, महापौर दीक्षा धबाले यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस कारणीभूत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. डिसेंबरपासूनच विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा बंद करणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे आज शहरातील नागरिकांसमोर जलसंकट उभे राहिले आहे. अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांच्या नाकर्तेपणामुळेच ही टंचाई उद्भवली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महापौर दीक्षा धबालेंसह स्थायी समिती सभापती फारुख अली खान, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, उमेश चव्हाण, किशोर स्वामी, अब्दुल सत्तार, विनय गिरडे, दुष्यंत सोनाळे आदींनी केली आहे.
तर दुसरीकडे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी शहरातील टंचाईला महापालिकेचे अकार्यक्षम अधिकारी, नगरसेवक जबाबदार असल्याची टीका केली. पदाधिकाºयांनी पाणीटंचाईचे खापर प्रशासनावर फोडले आहे. पण पाण्याचे योग्य नियोजन होत नसताना पदाधिकारी काय करत होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नाने सिद्धेश्वरचे पाणी उपलब्ध झाले असून उपलब्ध झालेल्या पाण्याचे महापालिकेने योग्य नियोजन करावे, असेही खोमणे यांनी म्हटले आहे.
२१ पथकांची पोलिसांसह गस्त राहणार
सिद्धेश्वर धरणातून नांदेडसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. परिणामी नांदेडची तहान भागविण्याच्या प्रयत्नांना मोठी खीळ बसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन शनिवारी सायंकाळी नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांच्या अध्यक्षतेखाली वसमत येथे नांदेड पाटबंधारे मंडळ, पूर्णा पाटबंधारे मंडळ आणि नांदेड महापालिकेच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत नांदेडसाठी सोडलेल्या पाण्यावर आगामी काळात १५ दिवस पहारा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.यामध्ये मनपाच्या सहा पथकांमध्ये जलसंपदा विभागाचे दोन कर्मचारी समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याचवेळी पथकाचे क्षेत्र वाढवून आता वसमत ते सिद्धेश्वरपर्यंत गस्त घातली जाणार आहे. महापालिकेच्या १८ पथकांसह ३ भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे.
संपूर्ण महापालिका पाण्याच्या गस्तीवर
शहरात झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेचे सर्व अधिकारी-कर्मचारी पाण्याच्या गस्तीवर नियुक्त करण्याचा निर्णय आयुक्त लहुराज माळी यांनी घेतला आहे. तीन पाणीपाळ्यामध्ये गस्तीवर राहणार आहेत. वसमतपासून आता ही गस्त सिद्धेश्वरपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून नांदेडला पाणी उपलब्ध व्हावे हीच भूमिका असल्याचे माळी म्हणाले.

Web Title: security appointed the water for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.