The scandals are 2018's year | घोटाळ्यांनी गाजले २०१८ चे वर्ष
घोटाळ्यांनी गाजले २०१८ चे वर्ष

ठळक मुद्देराज्यव्यापी घोटाळेएमपीएससी, पोलीस, धान्य, डांबर, बीटक्वॉईनचा समावेश

शिवराज बिचेवार।

नांदेड : गतवर्षात नांदेड जिल्हा घोटाळ्यांनी राज्यभर गाजला़ राज्यभर व्याप्ती असलेल्या या घोटाळ्यांची नांदेडात सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये अनेक बड्या मंडळींना तुरुंगाची हवा खावी लागली़ यातील अनेक प्र्रकरणांचा तपास अद्यापही सुरुच आहे़
घोटाळ्यांची सुरुवातच एमपीएससी नोकर भरतीपासून झाली़ किनवट तालुक्यातून या घोटाळ्याला सुरुवात झाली़ नोकर भरतीच्या परीक्षेत आपल्या जागी हुशार असलेल्या डमी विद्यार्थ्याला बसवून नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात लाखो रुपये बेरोजगार युवकांकडून उकळण्यात येत होते़ अशाप्रकारे राज्यभर बोगस उमेदवार परीक्षेला बसवून वर्ग १ ते ४ पर्यंत नोकऱ्या मिळविण्यात आल्या़ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया योगेश जाधव या युवकाने हा घोटाळा उघडकीस आणला़
त्यानंतर याचा तपास सीआयडीकडे देण्यात आला़ या प्रकरणात आतापर्यंत ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे़ त्यामध्ये पोलीस अधिकाºयांसह उच्च पदस्थांचा समावेश आहे़ राज्यभर या घोटाळ्याची व्याप्ती होती़ त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली होती़ त्यानंतर राज्यभरात पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारा भरती घोटाळा उघडकीस आला़ पोलीस भरतीच्या पेपर तपासणीचे काम करणाºया कंपनीचाच यामध्ये सहभाग होता़ अनेक उमेदवारांना एकसारखेच गुण मिळाले होते़
त्याचबरोबर अत्यंत कठीण समजले जाणारे प्रश्नही या उमेदवारांनी सोडविले होते़ याची कुणकुण तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांना लागली होती़ मीना यांनी परीक्षेत सर्वाधिक गुण घेणाºया काही उमेदवारांची उलटतपासणी करताच या घोटाळ्याचे बिंग फुटले़
या प्रकरणात बोगसगिरी करणाºया उमेदवारांसह कंपनीच्या अनेकांना अटक करण्यात आली होती़ त्यामध्ये पोलीस दलातील काही जणांचा समावेश असल्याचे समोर आले. त्यानंतर भरतीसाठी दुसºयांदा लेखी परीक्षा घेण्यात आली होती़ हा घोटाळाही राज्यभर गाजला़ हिंगोली, परभणी, पुणे यासह इतर जिल्ह्यांतही कंपनीने अशाचप्रकारे बोगस उमेदवारांची भरती केली होती़ शासकीय कार्यालयात संगणक आॅपरेटर या पदावर नोकरी लावण्यासाठी दोन महिन्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना बोगस नियुक्तीपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ यामध्ये शेकडो उमेदवारांकडून पैसे उकळण्यात आले होते़
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता़ परंतु, पुढे हे प्रकरण थंडबस्त्यात गेले़ नांदेडच्या कृष्णूर एमआयडीसीतील धान्य घोटाळाही राज्यभर गाजला़ या घोटाळ्यात धान्य पुरवठादार यासह अनेकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ त्याचा तपास आता सीआयडीकडून करण्यात येत आहे़
देशभर गाजलेल्या बीटक्वॉईनची सुरुवातही नांदेडातच
व्हर्च्युअल करन्सी म्हणजे आभासी चलन असलेल्या बिटक्वॉईनच्या माध्यमातून देशभरात अनेकांना गंडा घालणाºया अमित भारद्वाज याने या घोटाळ्याची सुरुवात नांदेडातच केली होती़ एमजीएम महाविद्यालयात शिकत असताना झालेल्या ओळखीचा फायदा घेत त्याने नांदेडकरांकडून बिटक्वॉईन घेत त्या बदल्यात त्यांना सुरुवातीला आकर्षक परतावा दिला होता़ त्यानंतर मात्र तो फिरला़ नांदेडात जवळपास शंभर कोटी रुपयांचे बिटक्वॉईन त्याने घेतले होते़ या प्रकरणात नांदेडात पहिला गुन्हा नोंदविल्यानंतर त्याची देशभर व्याप्ती असल्याचे आढळून आले़ देशभरात अनेक ठिकाणी त्याच्यावर गुन्हेही नोंदविले़त्यातून हा घोटाळा हजारो कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले़
तर तीन महिन्यांपूर्वीच उघडकीस आलेल्या डांबर घोटाळ्यातही अनेकांचे हात ‘काळे’ झाले आहेत़ शासकीय कंपनीकडून डांबर न घेता खाजगी व्यक्तीकडून डांबर घेत त्याच्या बनावट पावत्या लावून बिले उचलणाºयांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे़ अद्यापही तीन आरोपींना अटक होणे आहे़ तर इतर कंत्राटदार आणि अधिकारीही यामध्ये मोकळेच आहेत़ या घोटाळ्याच्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत़ त्यामुळे हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होत आहे़


Web Title: The scandals are 2018's year
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.