नांदेडच्या शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात रॅगिंग; सिनियर विद्यार्थ्यांची ज्युनिअर्संना मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:43 PM2018-01-24T13:43:53+5:302018-01-24T14:01:09+5:30

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी होणार्‍या फ्रेशर्स पार्टीची तयारी करण्याच्या निमित्ताने मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सिनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून रॅगिंग केली.

Ragging at Government Ayurvedic College of Nanded; Senior students beat up junior | नांदेडच्या शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात रॅगिंग; सिनियर विद्यार्थ्यांची ज्युनिअर्संना मारहाण 

नांदेडच्या शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात रॅगिंग; सिनियर विद्यार्थ्यांची ज्युनिअर्संना मारहाण 

googlenewsNext
ठळक मुद्देआयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी वसतिगृहात फक्त १६ खोल्या आहेत़ या खोल्यांमध्ये आजघडीला ४८ विद्यार्थी राहतात़द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सिनिअर विद्यार्थ्यांसाठी २५ जानेवारीला फ्रेशर्स (एकमेकांची ओळख व्हावी या उद्देशाने) पार्टी ठेवली होती़मंगळवारी रात्री वसतिगृहात राहणार्‍या सिनिअर विद्यार्थ्यांनी सोमेश कॉलनी भागात राहणार्‍या नऊ विद्यार्थ्यांना फ्रेशर्स पार्टीची तयारी करावयाची असे म्हणून वसतिगृहात बोलावून घेतले़

नांदेड : येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी होणार्‍या फ्रेशर्स पार्टीची तयारी करण्याच्या निमित्ताने मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सिनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून रॅगिंग केली. यावेळी मारहाणीमुळे काही विद्यार्थ्यांना ओकार्‍याही झाल्या. या प्रकरणाची वजिराबाद पोलिसांनी नोंद घेतली असून चौकशीसाठी हे प्रकरण आता महाविद्यालयातील अ‍ॅन्टी रॅगिंग समितीकडे देण्यात आले आहे़

आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी वसतिगृहात फक्त १६ खोल्या आहेत़ या खोल्यांमध्ये आजघडीला ४८ विद्यार्थी राहतात़ तर अनेक विद्यार्थी शहराच्या इतर भागात भाड्याने राहतात़ महाविद्यालयातील बीएएमएसच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सिनिअर विद्यार्थ्यांसाठी २५ जानेवारीला फ्रेशर्स (एकमेकांची ओळख व्हावी या उद्देशाने) पार्टी ठेवली होती़ या पार्टीसाठी महाविद्यालय प्रशासनाकडून परवानगीही घेण्यात आली होती़ परंतु त्यापूर्वीच हा प्रकार घडला़ 

मंगळवारी रात्री वसतिगृहात राहणार्‍या सिनिअर विद्यार्थ्यांनी सोमेश कॉलनी भागात राहणार्‍या नऊ विद्यार्थ्यांना फ्रेशर्स पार्टीची तयारी करावयाची असे म्हणून वसतिगृहात बोलावून घेतले़ वसतिगृहातील एका खोलीत ११ सिनिअर विद्यार्थी मद्य प्राशन करीत बसले होते. द्वितीय वर्षाचे विद्यार्थ्यांना आत घेत त्यांच्या  तोंडावर सिगारेटचा धूर सोडला़ तसेच काही जणांना जबरदस्ती दारु पाजण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे दोन विद्यार्थ्यांना ओकार्‍या झाल्या. तर रॅगिंगला विरोध करणार्‍यांना सिनिअरने मारहाण केल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे़ 

मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांनी रात्रीच वजिराबाद ठाणे गाठले़ पोलिसांनी या प्रकरणाची डायरीत नोंद करुन महाविद्यालय गाठले़ यावेळी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशीही त्यांनी केली़ तसेच याबाबत अधिष्ठाता डॉ.श्यामकुंवर यांना माहिती दिली़ दरम्यान, या प्रकरणाच्या निषेधार्थ सकाळी विद्यार्थ्यांनी जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत महाविद्यालय बंद राहिल असा पवित्रा घेतला़ त्यानंतर अधिष्ठाता डॉ़श्यामकुंवर यांनी हे प्रकरण चौकशीसाठी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीकडे दिल्याचे स्पष्ट केले़ 

११ सदस्यीय समितीकडे चौकशी
रॅगिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी महाविद्यालयात ११ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे़ आलेल्या नऊ विद्यार्थ्यांच्या तक्रारी या समितीकडे सोपविण्यात आल्या आहेत़ समिती या प्रकरणाच्या चौकशीनंतर जो अहवाल देईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ.श्यामकुंवर यांनी सांगितले़

वाहन नसल्याने अधिष्ठाता घरीच
मंगळवारी रात्री पोलिसांनी अधिष्ठातांना महाविद्यालयातील रॅगिंग प्रकाराबाबत माहिती दिली होती़ परंतु बराच वेळ पोलिस थांबलेले असतानाही अधिष्ठाता महाविद्यालयात आलेच नाही़ याबाबत त्यांना विचारले असता, वाहन नसल्यामुळे रात्री महाविद्यालयात येवू शकलो नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले़ 

आवारात दारुच्या बाटल्यांचा खच
महाविद्यालयाच्या पाठीमागेच विद्यार्थ्यांचे मोडकळीस आलेले वसतिगृह आहे़ वसतीगृहाच्या आवारात दारुच्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून आले़ विशेष म्हणजे वसतिगृहासाठी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे बाहेरची मुले या ठिकाणी येवून पार्ट्या झोडत असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले.

Web Title: Ragging at Government Ayurvedic College of Nanded; Senior students beat up junior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड