किनवट-भोकर महामार्गाचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:37 AM2019-06-27T00:37:05+5:302019-06-27T00:39:21+5:30

किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी-हिमायतनगर या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून निकृष्ट दर्जाचेही करण्यात येत आहे. सदर काम दोन वर्षांत पूर्ण करायचे होते.

The question of Kinwat-Bhokar highway will be solved | किनवट-भोकर महामार्गाचा प्रश्न सुटणार

किनवट-भोकर महामार्गाचा प्रश्न सुटणार

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदीप नाईक विधानसभेत आक्रमक पंधरा दिवसांत काम सुरू करण्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

नांदेड : किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी-हिमायतनगर या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून निकृष्ट दर्जाचेही करण्यात येत आहे. सदर काम दोन वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र दोन वर्षेे उलटल्यानंतरही या रस्त्याचे केवळ १९ टक्के काम झाल्याने पावसाळ्यात हा पूर्ण रस्ता बंद होण्याचा मुद्दा आ. प्रदीप नाईक यांनी बुधवारी विधानसभेमध्ये उपस्थित केला. या प्रकरणी संबंधितावर कारवाईची मागणीही नाईक यांनी लावून धरल्यानंतर अखेर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना हस्तक्षेप करावा लागला. सदर गुत्तेदाराला टर्मिनेट करण्यात येईल. याबरोबरच त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची घोषणाही पाटील यांनी केली. हा रस्ता वाहतुकीस योग्य करण्यासाठी बांधकाम विभागाच्या माध्यमातून येत्या १५ दिवसांत काम सुरू करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी- हिमायतनगर या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून ते निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. याबाबत किनवटचे आ. प्रदीप नाईक विधानसभेत आक्रमक झाले. २७ जून २०१९ रोजी हे काम नियमानुसार पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र दोन वर्षे उलटली तरी या रस्त्याचे केवळ १९ टक्के काम झाले आहे. झालेल्या कामामध्येही सबग्रेडचा मुरुम वापरण्यात आला असून संपूर्ण रस्ता खोदून टाकलेला आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्यापासून आजपर्यंत सदर रस्त्याचे काम पूर्णपणे बंद आहे. या अर्धवट रस्त्यावर सगळीकडे धुळीचे साम्राज्य असून मागील काही महिन्यांत २५ ते ३० अपघात झाल्याचे सांगत, या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी आ. नाईक यांनी केली. सदर रस्त्याचे काम इन्फोटेक कंपनीने घेतले असून रत्नाकर गुट्टे हे या कंपनीचे मालक आहेत. परंतु त्यांनी हे काम राठी या गुत्तेदाराला सबकंत्राट दिलेले आहे. ही निविदा ३०८ कोटी रुपयांची असून राठी यांचे तेवढे काम करण्याची क्षमता नसल्याने नोव्हेंबर महिन्यापासून काम पूर्णपणे ठप्प पडल्याने या भागातील नागरिकांना कमालीचा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे सदर गुत्तेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी आ. नाईक यांनी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी कंत्राटदाराला वारंवार सांगूनही त्याने काम केले नसल्याची कबुली देत सदर कंत्राटदारा विरोधात टर्मिनेशनची कार्यवाही सुरू करणार असून त्यानंतर दुसऱ्याला कंत्राट देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या उत्तरावर आ. प्रदीप नाईक यांचे समाधान झाले नाही. कंत्राटदाराच्या टर्मिनेशनची प्रक्रिया कशी पूर्ण करणार? हे सभागृहाला सांगावे, अशी मागणी त्यांनी केली. या चर्चेत आ. भास्कर जाधव यांनीही सहभाग घेत टर्मिनेट करण्याची प्रक्रिया धिमी आहे. तेवढे करुन हा प्रश्न सुटणार नाही. सदर कंत्राटदाराला आपण १ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. त्यामुळे आ. नाईक सांगतात त्याप्रमाणे सदर रस्ता तात्काळ पूर्ण होण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची मागणी जाधव यांनी केली. अखेर या प्रश्नावर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना उत्तर द्यावे लागले. किनवट-भोकर येथे काम करणाºया सदर कंत्राटदाराने राज्यामध्ये सहा ठिकाणी कामे घेतली असून सर्व सहाही ठिकाणी असाच गोंधळ केल्याचे सांगत संबंधित कंत्राटदाराला टर्मिनेट करण्यात येत आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र सदर काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी निगडित आहे. त्यामुळे या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी बोलून टर्मिनेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सदर कंत्राटदाराला केवळ टर्मिनेटच नाही तर त्याने सर्व सहा कामे अर्धवट ठेवल्याने त्याला ब्लॅकलिस्ट देखील केले जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
याबरोबरच राज्यात वेगवेगळ्या प्रकारची ५७ हजार किलोमीटरची कामे सुरू आहेत. मात्र चांगले कंत्राटदार मिळत नसल्याची खंत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. मात्र किनवटचा हा रस्ता दहा-वीस कोटी रुपये देवून तातडीने मार्गी लावू, असा शब्दही पाटील यांनी आ. नाईक यांच्या प्रश्नावर दिला.
तीन आठवड्यांत शॉर्ट पिरीएड टेंडर
आ. प्रदीप नाईक यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना येत असलेल्या अडचणींचा पाढा सभागृहात वाचला.पावसाळ्यात हा महामार्ग ठप्प होईल. पर्यायाने नांदेडशी संपर्क तुटेल, अशी भीती व्यक्त करीत सदर रस्ता तात्काळ पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी केली.
आ. नाईक़ यांच्या या मागणीवर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सदर रस्ता वाहतुकीस योग्य करण्याच्या दृष्टीने २१ किंवा ४५ दिवस न करता या रस्त्याचे शॉर्ट पिरीएड टेंडर काढण्यात येईल. याबरोबरच येत्या १५ दिवसांत जो कोणी काम घेईल त्या कंत्राटदाराला हे काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात येतील.
सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रक्रिया राबविल्यानंतर तात्पुरत्या रस्त्यासाठीचे काम बांधकाम विभागामार्फत करणार असल्याचे सांगितले. मात्र महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्राधिकरणामार्फतच काम करण्याचा आग्रह धरीत आहेत. या मागचे गुपित काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दोन वर्षांत केवळ १९ टक्के काम झाले आहे. पावसाळा सुरू झाला असून या अर्धवट कामामुळे नांदेडला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे तात्पुरती निविदा काढून रस्ता सुरू करा, दिशाभूल करणा-या अधिका-यावर कारवाई करा तसेच संबंधित कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका. - प्रदीप नाईक, आमदार, किनवट-माहूर.
---
काम स्वत: करण्याऐवजी सबकॉन्स्ट्रॅक्टर नेमायचा आणि १० टक्क्यांमध्ये मजा मारायचे सुरू आहे. याच कंत्राटदाराच्या राज्यातील सहा कामांची अशीच बोंब आहे. त्यामुळे सदर कंत्राटदाराला टर्मिनेटच नाही तर तातडीने ब्लॅकलिस्ट देखील करण्यात येईल.
- चंद्रकांत पाटील, बांधकाम मंत्री

Web Title: The question of Kinwat-Bhokar highway will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.