दुचाकीवरून २५ किमी प्रवास करतात बारावीच्या प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:34 AM2019-03-01T00:34:35+5:302019-03-01T00:36:18+5:30

तालुक्यातील चार परीक्षा केंद्रावर १८७२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत़ त्यापैकी तीन परीक्षा केंद्र हदगाव शहरात असून एक केंद्र मनाठा येथे आहे़ या केंद्रासाठी हदगाववरून (रनर) पेपर दुचाकीवरूनच ने-आण केले जात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

Quarterly Horoscope for HSC for 25 km | दुचाकीवरून २५ किमी प्रवास करतात बारावीच्या प्रश्नपत्रिका

दुचाकीवरून २५ किमी प्रवास करतात बारावीच्या प्रश्नपत्रिका

Next
ठळक मुद्देशिक्षण विभागाचा अक्षम्य गाफीलपणाम्हणे चारचाकी वाहन परवडत नाही

सुनील चौरे।

हदगाव : तालुक्यातील चार परीक्षा केंद्रावर १८७२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत़ त्यापैकी तीन परीक्षा केंद्र हदगाव शहरात असून एक केंद्र मनाठा येथे आहे़ या केंद्रासाठी हदगाववरून (रनर) पेपर दुचाकीवरूनच ने-आण केले जात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. दुचाकीला अपघात झाला अथवा कोणी अडवून पेपरचा गठ्ठा गहाळ केल्यास जबाबदार कोण? या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे होणार नाही का?असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे़
विशेष म्हणजे मनाठा परीक्षा केंद्रासाठी हदगाव येथून एका दुचाकीवर पेपर आणले जातात़ त्यांना कोणतीही सुरक्षा नाही़ २५ कि़मी़चा हा प्रवास खडतरच आहे़ रस्त्याची कामे सुरू आहेत़ उन्हाळा सुरू झाला़ त्यामुळे दुचाकी पंक्चर होण्याची शक्यता असतेच़ दुचाकीला किरकोळ अपघात अथवा नादुरुस्त झाली तर दुसरा उपाय नाही़
परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा अथवा एक तासापूर्वी पेपर मनाठा केंद्रावर हे रनर घेवून येतात़ यासाठी जि़प़ शाळेचा एक शिक्षक व एक सेवक मदतीसाठी असतो़ या दुचाकीची कोणी चेष्टेने अडवणूक केली तरी येथील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचे काय होणार? असा सवाल आहे. २३५ विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर आहेत़ कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरू आहे़ परंतु पेपर ने-आण करण्यासाठी निदान चारचाकी वाहनाची व्यवस्था शिक्षण विभागाने करायला हवी़ परंतु त्याचे भाडे देण्यासाठी निधी कोठून आणायचा? असा प्रश्न केंद्र पर्यवेक्षक डी़आऱ भारती यांनी केला. एकूणच सगळा प्रकार गोंधळाचा आहे. जिल्हा परिषदेच्या नांदेड येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपरोक्त प्रकाराकडे लक्ष देवून योग्य अशा वाहनाची सोय करावी, अशी मागणी पालकांची आहे.
मनाठ्यात डेस्कही नाहीत !
पाल्य चांगल्या गुणांनी टॉपमध्ये यावा व त्याच्या उच्च शिक्षणासाठी नंबर लागावा यासाठी पालक प्रयत्नशील असतात़ त्यासाठी स्वत:चा वेळ व पैसा खर्च करण्याची तयारी त्यांची असते़ परीक्षा सुरू झाल्या की बारावीला असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी सर्वांचीच परीक्षा सुरू असते़ घरी विद्यार्थ्यास अभ्यासासाठी वेगळी खोली, टेबल, डेस्क यांची व्यवस्था करण्यात येते़ परंतु याच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ही व्यवस्था मिळत नाही़ मनाठा केंद्रावर तर पेपर लिहण्यासाठी डेस्कही नाहीत़ टेबलवर बसून विद्यार्थी पेपर लिहितात़
नायगाव तालुक्यात दहावीची ११ केंदे्र, २९११ परीक्षार्थी
४नायगाव बाजार : तालुक्यात दहावीचे ११ परीक्षा केंद्र असून २ हजार ९११ विद्यार्थी संख्या असून परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे़ १ मार्चपासून या परीक्षा सुरू होत आहेत़ जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा या परीक्षा केंद्रावर २८० विद्यार्थी संख्या आहे़ जनता हायस्कूल नायगाव येथे ३८३ विद्यार्थी, जिल्हा परिषद मा़ वि़ घुंगराळा १९१, यमुनाबाई विद्यालय नायगाव २५०, पोस्ट बेसिक आश्रम शाळा मरवाळीतांडा ३९४, ब्लू बेल्स विद्यालय नायगाव २५०, दत्त माध्यमिक विद्यालय नायगाव २४४, जि़प़ हायस्कूल कुंटूर २१५, ज्ञानेश्वर विद्यालय धुप्पा ३१८, शंकर हायस्कूल कोलंबी २३२, माध्यमिक आश्रम शाळा कुंटूर तांडा २३७ विद्यार्थी आहेत़
तालुका शिक्षणाधिकारी केक़े़ फटाले व परीरक्षक एम़एम़ दुरनाळे यांनी केंद्र संचालकाची एक बैठक घेवून महत्त्वाच्या सूचना दिल्या़ परीक्षा काळात भारनियमन करण्यात येवू नये म्हणून वीज वितरण कार्यालयास व वेळेवर बस सोडाव्यात म्हणून आगार प्रमुखांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे़
कंधार तालुक्यात विशेष बैठे पथक
कंधार : तालुक्यात दहावी परीक्षाना १ मार्चपासून सुरूवात होत आहे. परीक्षा कॉपीमुक्त होऊन तालुक्यातील विद्यार्थी गुणवत्तेत सरस रहावा यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने परीक्षा केंद्रावर विशेष बैठे पथकाची करडी नजर ठेवणार असल्याचे समोर आले आहे.
कंधार परिरक्षक कार्यालया अंतर्गत १३ परीक्षा केंद्राचा समावेश आहे. १ मार्चपासून दहावी परीक्षेस मराठी विषयाने सुरूवात होत आहे. पहिल्या दिवशी मराठी विषयाला या तेरा केंद्रावर ३ हजार ७३९ विद्यार्थी परीक्षेला सामोर जाणार आहेत.कंधार तालुक्यातील पेठवडज हे परीक्षा केंद्र मुखेड परिरक्षक कार्यालयाला जोडले आहे. येथे ४०९ विद्यार्थी मराठी विषयाच्या परीक्षेस सामोरे जाणार आहेत. तसेच शिराढोण परीक्षा केंद्रावर ३९० विद्यार्थी असून हे केंद्र नांदेडला जोडले आहे. कंधार परिरक्षक कार्यालयाचे परिरक्षक म्हणून नंदकुमार कौठैकर असून त्यांना ए.व्ही.येनगे, मकरंद भागानगरे, शेख मुस्तफा, गणेश थोटे, विश्वांभर मटके यांचे सहकार्य राहणार आहे. गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ते परीक्षा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Quarterly Horoscope for HSC for 25 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.