त्रिसदस्यीय समितीची उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 06:49 PM2019-07-02T18:49:17+5:302019-07-02T18:52:03+5:30

पाणीसाठाच नसल्याने बाभळी बंधाऱ्याचे झाले वाळवंट

In the presence of the three-member committee, 14 doors of the Babhali Dam opened | त्रिसदस्यीय समितीची उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडले

त्रिसदस्यीय समितीची उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडले

Next
ठळक मुद्दे वीजपुरवठा बंद असल्यामुळे जनरेटरच्या सहाय्याने उघडले दरवाजे गत सहा वर्षांपासून बाभळी बंधाऱ्याचा २़७४ टीएमसी पाणीसाठा आजपर्यंत  पूर्ण झाला नाही.

धर्माबाद (जि़ नांदेड) : तालुक्यातील वादग्रस्त बाभळी बंधाऱ्याचे सर्व १४ दरवाजे १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात आले. बंधाऱ्यावरील वीजपुरवठा खंडित असल्याने जनरेटरच्या सहाय्याने १४ दरवाजे उघडण्यात आले. बंधारा अगोदरच कोरडाठाक पडल्याने बाभळी बंधाऱ्याचे अक्षरश: वाळवंट झाले आहे.

देशभरातील बहुचर्चित तसेच महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात बाभळी बंधारा निर्मितीवरून वाद झाला होता. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर २८ फेब्रुवारी २०१३ रोजी न्यायालयाने याप्रकरणी निकाल देत १ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात येतील व २९ आॅक्टोबर रोजी बंद करण्यात यावेत तसेच उपलब्ध पाणीसाठ्यापैकी दशांश सहा टीएमसी पाणी १ मार्च रोजी तेलंगणात सोडण्यात यावे. या निकालानुसार १ जुलै रोजी बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे जनरेटरच्या सहाय्याने उघडण्यात  आले. बंधाऱ्यावरील सेंटरचा पहिला दरवाजा  सकाळी ११ वाजता उघडण्यात आला. हळूहळू सायंकाळपर्यंत चौदाही दरवाजे उघडण्यात आले. सर्व प्रयत्न करूनही सर्वोच्च  न्यायालयाने बाभळी  बंधाऱ्यास काही अटी  टाकून  न्याय दिला. बंधाऱ्यास न्याय मिळाला; पण  जाचक अटींमुळे  बंधाऱ्यात पाणीसाठा राहात नसल्याने पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.

गत सहा वर्षांपासून बाभळी बंधाऱ्याचा २़७४ टीएमसी पाणीसाठा आजपर्यंत  पूर्ण झाला नाही. त्याचे कारणही तसेच आहे. पावसाळा संपल्यानंतर म्हणजे २९ आॅक्टोबरला गेट खाली टाकले जातात. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून गेल्यानंतर पाणीसाठा होतच नाही.  झालाच तर दुसऱ्या अटीप्रमाणे एक मार्च रोजी असलेल्या साठ्यातील ०़६ टीएमसी पाणी सोडावे लागते म्हणजेच पाणीसाठा असला तर सर्व साठा सोडावा लागतोच. या कारणाने बाभळी बंधारा कोरडाच असतो म्हणून कोरड्या बंधाऱ्याचे गेट टाकून काय फायदा? असा खोचक प्रश्न जनतेतून ऐकायला मिळतो. तिसरी  अट  म्हणजे, १ जुलै रोजी सर्व गेट उघडल्याने पूर्ण पावसाळा संपेपर्यंत सर्व गेट उघडे राहणार. मग असा प्रश्न पडतो की, बाभळी बंधाऱ्याच्या हक्काचे २़७४ टीएमसी पाणीसाठा कसा जमा होईल? 

१ जुलै ते २९ आॅक्टोबर या चार महिन्यांच्या पावसाळा कालावधीत आंध्र प्रदेशातील श्रीराम धरणाचा ११२ टीएमसी पाणीसाठा कराराप्रमाणे झाल्यावर जादाचे पाणी आंध्र प्रदेश धरणाचे सर्व दरवाजे उचलून पाणी सागराला सोडून देते. या प्रकारामुळे नदीचे पाणी श्रीराम सागररालही नाही व बाभळी बंधाऱ्यालाही नाही तर सर्व पाणी समुद्रात आहे. सर्वपक्षीय बाभळी बंधारा कृती समिती व शेतकरी, सर्व लोकप्रतिनिधीची अशी मागणी आहे की, आम्ही सर्व सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा व दिलेल्या निकालाचा सन्मान करतो मग दुसरा प्रश्न पुढे येतो, बाभळी बंधाऱ्यातील २़७४ टीएमसी पाणीसाठा गेला कुठे? म्हणून पुन्हा हक्काचा पाणीसाठा द्या ही मागणी पुढे येऊ लागली आहे.

यावेळी केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता व्ही. गंगाधर, तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता बी. रामाराव, आंध्र प्रदेश राज्यातील कार्यकारी अभियंता के. नारायण रेड्डी, महाराष्ट्र पाटबंधारे विभाग नांदेडचे कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, श्रीराम सागरचे उपविभागीय अभियंता  टी. जगदीश, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता गणेश शेळके, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर.के. मुक्कावार, सब डिव्हिजनल इंजिनिअर श्री.जगन, कनिष्ठ अभियंता एस़ बी़ देवकांबळे तसेच बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर, सहसचिव जी. पी. मिसाळे, नीळकंठ पाटील आदमपूरकर, गंगाधर पाटील बाभळीकर, सय्यद मसूद आली, चव्हाण, गुंडेवार, गुंजकर, पांडे आदी उपस्थित होते. 
 

Web Title: In the presence of the three-member committee, 14 doors of the Babhali Dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.