पेट्रोल दरात २५ दिवसात ५ रुपयांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:34 PM2018-11-11T23:34:53+5:302018-11-11T23:35:59+5:30

गेल्या २५ दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही पैशांची घट होत असून पेट्रोलचे दर जवळपास पाच रुपयांनी कमी झाले आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांना तेवढाच का होईना दिलासा मिळाला आहे़

Petrol price cut by 5 rupees in 25 days | पेट्रोल दरात २५ दिवसात ५ रुपयांनी घट

पेट्रोल दरात २५ दिवसात ५ रुपयांनी घट

Next
ठळक मुद्देसामान्यांना दिलासा वाढीप्रमाणेच इंधन दरात दररोज होतेय काही पैशांची कपात

नांदेड :देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाल्यानंतर सरकारने पेट्रोलच्या दरात पाच रुपये कमी करण्याची घोषणा केली होती़ परंतु प्रत्यक्षात पेट्रोलच्या दरात केवळ ४ रुपये ३५ पैशांचीच सुट मिळत होती़ परंतु सरकारने केलेला दरकपातीच्या आनंदावर दहा दिवसातच विरझण पडले होते़ पेट्रोल १ रुपया २० पैशांनी पुन्हा महागले होते़ त्यात गेल्या २५ दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही पैशांची घट होत असून पेट्रोलचे दर जवळपास पाच रुपयांनी कमी झाले आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांना तेवढाच का होईना दिलासा मिळाला आहे़
गेल्या काही महिन्यात मोजके काही दिवस सोडल्यास दररोज काही पैशांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ होत होती़ त्यामुळे पेट्रोलचे दर लवकरच सेंच्युरी ठोकतील असा अंदाज वर्तविण्यात येत होता़ १ आॅगस्टला नांदेडात पेट्रोल ८५़२८ पैसे तर डिझेल ७२़३९ पैसे प्रति लिटर होते़ त्यानंतर ३० आॅगस्टला यामध्ये वाढ होवून पेट्रोल ८७़३१ तर डिझेल ७४़६६ रुपयांवर गेले होते़ सप्टेंबर महिन्यातही दरवाढीचा आलेख चढताच होता़
३० सप्टेंबर रोजी नांदेड शहरात पेट्रोल ९२़३९ तर डिझेल ७९़७० रुपयांवर गेले होते़ गत दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलमध्ये साधारणता सात रुपयांनी वाढ झाली होती़ सरकारने ४ आॅक्टोबर रोजी राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा केली होती़ त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली होती़ परंतु प्रत्यक्षात लिटरमागे फक्त ४ रुपये ३५ पैशांचाच दिलासा मिळत होता़
तर डिझेलचे दर २ रुपये ५९ पैशांनी कमी झाले होते़ परंतु त्यानंतरही गत दहा दिवसात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही पैशांनी वाढतच होत्या़ १४ आॅक्टोबर रोजी नांदेडात पेट्रोलचा दर ८९़७९ तर डिझेल ७९़३५ रुपयांनी विक्री करण्यात येत होते़ त्यानंतर मात्र दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होत आहे़ २५ आॅक्टोबरला पेट्रोल-८८़२० तर डिझेल ७८़७५ पैसे प्रति लिटर होते़
३१ रोजी पेट्रोल-८६़६७, डिझेल- ७७़७०, ५ नोव्हेंबरला पेट्रोल-८५़८४ तर डिझेल ७७़१९ रुपये लिटर होते़ तर ११ नोव्हेंबर रोजी पेट्रोल ८५़०३ तर डिझेल ७६़४६ रुपये प्रति दराने विक्री केले जात होते़ म्हणजेच गत २५ दिवसात पेट्रोलच्या दरात जवळपास पाच रुपयांनी घट झाली आहे़ त्यामुळे नागरीकांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे़
दरम्यान, मागील काही महिन्यात सातत्याने झालेल्या इंधनाच्या दरवाढीमुळे पेट्रोल नव्वदीपर्यंत तर डिझेलचे दर ऐंशी रुपयापर्यंत गेले होते़ त्यामुळे खाजगी वाहतुकदारांनीही दरात वाढ केली होती़ खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दर वाढविले होते़ त्याचबरोबर आॅटोचालक, मालवाहतुकीचे दरही जादा आकारण्यात येत होते़
परंतु आता गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने घट होत असताना वाहनधारकांनी मात्र आपले दर जैसे थे ठेवले आहेत़ यातून नागरीकांची मात्र लुट होत आहे़ त्यामुळे इंधन दराबरोबर वाढविलेल्या वाहनधारकांनी वाढविलेले दरही कमी करण्याची गरज आहे़
आणखी दर कमी होण्याची शक्यता
गेल्या महिनाभरापासून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत आहेत़ त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे़ येत्या काही दिवसात आणखी दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ अशी प्रतिक्रिया पेट्रोल पंप चालक सचिन पाळेकर यांनी दिली़
सर्वसामान्य नागरिकांची लूट मात्र सुरुच
इंधन दरवाढीतून सरकारने थोडा फार दिलासा दिला आहे़ ही समाधानकारक बाब असली तरी, इतर मार्गाने मात्र सरकारकडून सर्वसामान्य नागरीकांची लुटच करण्यात येत आहे़ महागाईचा दर वाढतच चालला आहे़ अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महेंद्र देमगुंडे यांनी दिली़

Web Title: Petrol price cut by 5 rupees in 25 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.