नांदेडात अवतरली शिवशाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:42 AM2019-02-20T00:42:49+5:302019-02-20T00:43:14+5:30

शाहिरी जलसा, पोवाडे अन् मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेले तलवारबाजी, लाठीकाठी अन् दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके, शिवकालीन देखावे, ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांच्या नावाच्या गगनभेदी घोषणांनी शहरात शिवशाही अवतरल्याचे चित्र नांदेडकरांना अनुभवायला मिळाले़

Nandedat incarnated Shivshahi ... | नांदेडात अवतरली शिवशाही...

नांदेडात अवतरली शिवशाही...

Next

नांदेड : शाहिरी जलसा, पोवाडे अन् मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेले तलवारबाजी, लाठीकाठी अन् दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके, शिवकालीन देखावे, ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांच्या नावाच्या गगनभेदी घोषणांनी शहरात शिवशाही अवतरल्याचे चित्र नांदेडकरांना अनुभवायला मिळाले़
शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आपल्या लाडक्या राजाला अभिवादन करण्यासाठी १९ फेब्रुवारीच्या भल्या पहाटेपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती़ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेकांनी अभिवादन केले़ रात्री उशिरापर्यंत अभिवादनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ यावेळी युवकांकडून होणारा शिवरायांचा जयघोष, जय जिजाऊ, जय शिवरायांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता़
दरम्यान, शहरातील नवीन मोंढा, छत्रपती चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा, सांगवी नाका, चैतन्यनगर, भाग्यनगर, आनंदनगर, अण्णाभाऊ साठे चौक, सिडको-हडको आदी भागांतून निघालेल्या मिरवणुका आणि त्यात सहभागी कार्यकर्त्यांकडून होणारा शिवरायांचा जयघोष मनामनात स्फुरण निर्माण करणारा ठरला़ नवीन मोंढा येथे मराठा सेवा संघ आणि ३२ कक्षाच्या वतीने आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन समारंभानंतर त्याच मंडपात दोन जोडप्यांचा शिवविवाह सोहळा पार पडला़ प्राग़ंगाधर बनबरे यांचे व्याख्यान झाले आणि त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली़
पावडेवाडी नाका परिसरातील राजर्षी शाहू महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाज आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याची सुरूवात शाहिरी जलशाने झाली़ त्यानंतर उद्घाटन सोहळा, शिवबाचा जन्मोत्सव सोहळा आणि त्यानंतर पाळणा गीते झाली़ यावेळी मंचावर उभारलेला पाळणा, शिवकालीन देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले़ दरम्यान, छावाचे शहराध्यक्ष तानाजी पाटील यांच्या नेतृत्वात भाग्यनगर येथून मिरवणूक काढण्यात आली़
शेतकरी आत्महत्या नाटिकेने वेधले लक्ष
सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उद्घाटन सोहळ्यास खा़अशोकराव चव्हाण, आ़ डी़ पी़ सावंत, आ़अमरनाथ राजूरकर, आ़राम पाटील रातोळीकर, जि़प़अध्यक्षा शांताबाई पवार, राजेश पवार, पुनम पवार आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, मिरवणुकीमध्ये बाल कलावंतांनी विविध नाटकांचे सादरीकरण केले़ उघड्या ट्रकवर मंच साकारून सामाजिक बांधीलकी जोपासणारे आणि जनजागृती निर्माण करणारे विविध नाटकं या कलावंतांनी सादर केले़ यामध्ये शेतकरी आत्महत्येवर आधारित नाटकातील अभिनय काळजाला भिडणारा ठरला़ या रॅलीत शिवकालीन देखावे तसेच राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून जिवंत देखावे तयार करण्यात आले होते़ त्याचबरोबर लेझीम पथक, दांडपट्टा पथक आणि ढोल पथकाच्या उत्कृष्ट सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले़
पहाडी आवाजात डफावर थाप अन् त्याला तुणतुण्याची साथ
शिवजन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये शाहिरांनी सर्वांचे लक्ष वेधले होते़ शिवरायांच्या पराक्रमांचे पोवाडे गाताना पहाडी आवाजात पडणारी डफावर थाप अन् त्याला तुणतुण्याची साथ यामुळे अंगावर शहारे उभे राहत होते़ प्रतापगड, पुरंदर, आग्रा येथून सुटका यासह शिवरायांच्या जीवनातील अनेक रोमांचकारी प्रसंग शाहिरांनी पोवाड्यातून उभे केले होते़ शाहिरांच्या या वीररसाच्या पोवाड्यांनी अवघे वातावरण शिवमय झाले होते़ या पोवाड्यांना नांदेडकरांनीही भरभरुन प्रतिसाद दिला़

Web Title: Nandedat incarnated Shivshahi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.