नांदेडात ‘गोविंदा-गोविंदा’च्या गजरात सिमोल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:40 PM2018-10-18T23:40:28+5:302018-10-18T23:42:34+5:30

‘गोविंदा गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा’ च्या गजरात लाखो भाविकांनी गुरुवारी भगवान बालाजीचे दर्शन घेतले. सायंकाळी निघालेल्या भगवान बालाजीच्या रथयात्रेतही भाविकांनी सहभागी होण्यासाठी गर्दी केली.

Nandedat 'Govinda-Govinda' sanglanglun gajra | नांदेडात ‘गोविंदा-गोविंदा’च्या गजरात सिमोल्लंघन

नांदेडात ‘गोविंदा-गोविंदा’च्या गजरात सिमोल्लंघन

Next
ठळक मुद्देसंघाचे शहरात पथसंचलनधम्मचक्र प्रवर्तन दिनही उत्साहात साजरागाडीपुरा भागात रावणदहनास हजारो भाविक उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ‘गोविंदा गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा’ च्या गजरात लाखो भाविकांनी गुरुवारी भगवान बालाजीचे दर्शन घेतले. सायंकाळी निघालेल्या भगवान बालाजीच्या रथयात्रेतही भाविकांनी सहभागी होण्यासाठी गर्दी केली.
शहरातील बालाजी मंदिरात गुरुवारी पहाटेपासूनच दसऱ्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. प्रतिकात्मक सोने एकामेकांना देवून शुभेच्छाही दिल्या. दस-यानिमित्त सणानिमित्त शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बालाजी मंदिरामध्ये दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘गोविंदा गोविंदा गोविंदा’ या घोषणेने बालाजी मंदिर परिसर दणाणून गेला होता. दसरा महोत्सवानिमित्त बालाजी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात अलाी होती. श्री बालाजीचे दर्शन घेण्यासाठी शहरासह परिसरातील भाविक नांदेडात दाखल झाले होते.
सायंकाळी सहाच्या सुमारास रथयात्रेला प्रारंभ झाला. लाखो भाविकांनी या रथयात्रेत सहभाग नोंदविला. ‘गोविंदा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा’ च्या गजराने परिसर दुमदुमला होता. श्री बालाजी मंदिरापासून जुन्या मोंढ्यापर्यत आणि दुसºया बाजूने गुरुद्वारा चौकापर्यत पाय ठेवायलाही जागा नव्हती. लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित होते.
शहरातील जुन्या नांदेडात गाडीपुरा येथे रावणदहन करण्यात येतो. गाडीपुरा येथील हनुमान मंदिरातही दर्शनासाठी हजारो भाविक जमले होते. गाडीपुरा येथे गेल्या अनेक वर्षापासून रावणदहनाचा कार्यक्रम होतो. रात्री दहाच्या सुमारास रावणदहन करण्यात आला.
दरम्यान, गुरुवारी संघ परिवाराच्या वतीने सकाळी शहरातील मल्टी पर्पज हायस्कूल येथून पथसंचलनाला प्रारंभ करण्यात आला. चिखलवाडी, बडपुरा, भगतसिंग चौक, लालवाणी पेट्रोलपंप मार्गे बर्की चौक आणि परतीच्या मार्गाने हबीब टॉकीज, रेणूकामाता मंदिर, जुना मोंढा, गुरुद्वारा चौक मार्गे परत मल्टीपर्पज हायस्कूल येथे या पथसंचालनाचा समारोप करण्यात आला. यावेळी संघाचे डॉ. सुधीर कोकरे, डॉ. गोपाल राठी, विक्रम खतगाये, हेमंत इंगळे, अमोल अंबेकर, बापू किनगावकर, मंगेश नवकांडे, व्यंकटेश शिनगारपुतळे यांच्यासह भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, चैतन्य देशमुख, संजय कौडगे, प्रवीण साले, शीतल खांडील, विरोधी पक्ष नेत्या गुरुप्रितकौर सोडी, भाजपा युवा मोर्चाचे दिलीपसिंघ सोडी, मोहनसिंह तौर आदींची उपस्थिती होती.
संघाच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन केले. दरम्यान, शहरातील अनेक भागात दस-यानिमित्त प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात आले. हनुमानगड येथेही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकमेकांना आपट्याची पाने देवून शुभेच्छा दिल्या.

 


धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादन

  • धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी अभिवादन सभा घेण्यात आल्या. शहरातील भीमघाट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने घेण्यात आला. गुरुवारी सकाळी ८ वाजता नांदेड दक्षिण शहरचे अध्यक्ष प्रा. रामचंद्र गायकवाड यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. तर उत्तर नांदेडचे शहराध्यक्ष पी. आर. धुळे यांनी २२ प्रतिज्ञा दिल्या.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झालेल्या मुख्य अभिवादन सभेला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष डॉ. वि. वा. एंगडे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे यांनी पुष्पांजली अर्पण केली.संस्कार सचिव बी.एन. कांबळे यांनी उपस्थितांना २२ प्रतिज्ञा दिल्या. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदनाही देण्यात आली.
  • रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण केले. भैय्यासाहेब आंबेडकरनगर येथील त्रिपीटक बुद्ध विहारात मोहनराव गोडबोले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. किसा गौतमी महिला मंडळाच्या वतीने अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमास चंद्रकांत गोडबोले, दीपक सातोरे, चंद्रमुनी पडघणे, सुनील गोडबोले, अशोक खाडे, मनोहर राजभोज, कुंडलीकराव कांबळे, महानंदाबाई पंडित, सुमनबाई पाटील, शांताबाई निखाते, सुनील ढगे आदींची उपस्थिती होती.
  • धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने जिल्ह्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणच्या विहारामध्ये पंचशील ध्वजारोहणसह त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली.

Web Title: Nandedat 'Govinda-Govinda' sanglanglun gajra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.