नांदेड - पुणे ‘शिवशाही’ प्रवास लाखाच्या घाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 07:51 PM2018-03-21T19:51:39+5:302018-03-21T19:51:39+5:30

खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेस काही ठिकाणी नफ्यात तर काही ठिकाणी तोट्यात धावत आहेत़ दरम्यान, नांदेड येथून चालविण्यात येणारी पुणे शिवशाही बस जवळपास दीड ते २ लाख रूपये तोट्यात धावत आहे़ तर हैदराबाद  शिवशाही दहा ते १२ लाख रूपये नफ्यात धावत आहे़ 

Nanded - Pune 'Shivshahi' journey in the valley of Lakhan | नांदेड - पुणे ‘शिवशाही’ प्रवास लाखाच्या घाट्यात

नांदेड - पुणे ‘शिवशाही’ प्रवास लाखाच्या घाट्यात

googlenewsNext

- श्रीनिवास भोसले

नांदेड : खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेस काही ठिकाणी नफ्यात तर काही ठिकाणी तोट्यात धावत आहेत़ दरम्यान, नांदेड येथून चालविण्यात येणारी पुणे शिवशाही बस जवळपास दीड ते २ लाख रूपये तोट्यात धावत आहे़ तर हैदराबाद  शिवशाही दहा ते १२ लाख रूपये नफ्यात धावत आहे़ 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने भाडेतत्त्वावर खासगी कंपन्याच्या वातानुकूलीत बसेस राज्यभरात सुरू केल्या आहेत़ यामध्ये नांदेड विभागाला आजपर्यंत दहा गाड्या मिळाल्या आहेत़ सर्व गाड्या प्रसन्ना कंपनीच्या असून हैदराबाद आणि पुणे मार्गावर चालविण्यात येत आहेत़ 
पहिल्या टप्प्यात आलेल्या सहा गाड्या नांदेड - हैदराबाद- नांदेड मार्गावर चालविण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले़ परंतु, गर्दीचा मार्ग आणि प्रवाशांची मागणी पुणे गाडी सुरू करण्यासाठी असल्याने हैदराबाद मार्गावर शिवशाही बसेस चालविण्याच्या निर्णयावर प्रवाशांकडून टीका करण्यात आली होती़ मात्र, आजघडीला पुणे शिवशाही तोट्यात धावत असून नांदेड - हैदराबाद गाडीच चांगल्या नफ्यात धावत असल्याचे मागील दोन महिन्यांतील उत्पन्नावरून स्पष्ट झाले आहे़.

नांदेड येथून हैदराबाद मार्गावर जानेवारी महिन्यात शिवशाही बसच्या एकूण ६९ फेर्‍या झाल्या़ यातून प्रतिकिलोमीटर ३३़४१ रूपये तर एकूण उत्पन्न १० लाख २३ हजार १११ रूपये मिळाले आहेत़ यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातदेखील वाढ झाली आहे़ फेब्रुवारी महिन्यात ३२८ फेर्‍या झाल्या असून त्यातून ३७ लाख २५ हजार ४ रूपये तर १० मार्चपर्यंत झालेल्या ११२ फेर्‍यातून १४ लाख ९ हजार ५६७ रूपये उत्पन्न मिळाले आहे़ मार्च महिन्यातील सुट्या आणि लग्नसराईमुळे उत्पन्नात चांगलीच वाढ झाली असून प्रतिकिलोमीटर ४१़९५ रूपये उत्पन्न मिळत असल्याची नोंद झाली आहे़  पुणे  शिवशाही गाडीतून आजपर्यंत ३२ रूपये प्रतिकिलोमीटर उत्पन्न मिळालेले नाही़ 

फेब्रुवारी महिन्यात नांदेड-पुणे-नांदेड मार्गावर २२ फेर्‍यांमधून २ लाख ३३ हजार ३५६ रूपये उत्पन्न मिळाले आहे़ तर १० मार्चपर्यंत झालेल्या २० फेर्‍यांमधून २ लाख ४१ हजार ८८८ रूपये उत्पन्न मिळाले़  महामंडळाला किमान ३२ रूपये प्रतिकिलोमीटर उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे़ परंतु, पुणे मार्गावर आजपर्यंत २३़११ रूपये तर हैदराबाद मार्गावर ३७़८६ रूपये प्रतिकिलोमीटर उत्पन्न मिळाले आहे़ हैदराबाद गाडी सध्या दहा ते बारा लाख रूपयांनी नफ्यात तर पुणे शिवशाही जवळपास २ लाख रूपये तोट्यात धावत आहे़  तोट्यात चाललेल्या पुणे गाडीला सध्या हैदराबाद गाडीचा आधार मिळत आहे़ 

वर्कशॉप येथून धावणार शिवशाही
खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्स सर्रासपणे वर्कशॉप, हिंगोली गेट येथून धावतात़ त्यामुळे प्रवाशांना सोयीचे व्हावे आणि शिवशाही बसेसची माहिती व्हावी, या उद्देशाने लवकरच पुणे आणि हैदराबादला सोडण्यात येणार्‍या शिवशाही बसेस बसस्थानकाऐवजी वर्कशॉप येथील एसटीच्या विभागीय कार्यालय परिसरातून सोडण्यात येणार आहेत़ 

प्रवाशांनी शिवशाहीचा लाभ घ्यावा- नेहूल
येणार्‍या काळात पुणे मार्गावर धावणार्‍या शिवशाही वातानुकूलीत बसला अपेक्षित प्रवासी मिळाले नाही तर ही गाडी बंद करण्याची वेळ महामंडळावर येवू शकते़ सध्या नांदेड येथून रात्री ८ आणि ९ वाजता आणि पुणे चिंचवड येथून रात्री ८आणि ९ वाजता शिवशाही बस सोडण्यात येते़ प्रवाशांनी या गाडीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी पी़ एस़ नेहूल यांनी केले आहे़ दरम्यान, पुण्यासाठी नांदेड येथून स्वतंत्र रेल्वेची मागणी होत असताना पुणे शिवशाहीला मिळणार्‍या अत्यल्प प्रतिसादाची कारणे शोधणे गरजेचे आहे़ 

Web Title: Nanded - Pune 'Shivshahi' journey in the valley of Lakhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.