Nanded police to set up 200 houses; Additional Director General of Police gives information | नांदेडात पोलिसांसाठी दोनशे घर उभारणार; अप्पर पोलीस महासंचालकांची माहिती
नांदेडात पोलिसांसाठी दोनशे घर उभारणार; अप्पर पोलीस महासंचालकांची माहिती

नांदेड : राज्यातील ७० टक्के पोलीस कर्मचार्‍यांना स्वत:ची घरे देण्याचा मानस असून नांदेडातही २०० घरे बांधण्यात येणार आहेत़ त्यासाठी जागेचा शोध सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक व्ही़व्ही़लक्ष्मीनारायण यांनी दिली़

जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी करण्यासाठी शनिवारी लक्ष्मीनारायण हे नांदेडात आले़ यावेळी ते म्हणाले, पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या शरीराचे रक्षण करणारे बुलेटप्रूफ कवच आणि शिरस्त्राण खरेदी करण्यात आले आहेत़ त्यांची संख्या सध्या पाच हजार आहे़, परंतु ही संख्या आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत़ पोलिसांसाठी शासकीय घरे बांधताना विशेष पद्धत अवलंबिली जाणार आहे़ जेणेकरुन पोलीस कर्मचार्‍यांना त्रास होणार नाही़ पोलीस ठाण्यामध्ये बॅरेकसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे़

पोलीस कर्मचारी स्वत:चे घर बांधण्याच्या तयारीत असतील तर त्यांना घरबांधणी अतिरिक्त रक्कम देण्यासाठी बँकेसोबत करार करण्यात आला आहे़ त्यासंदर्भाने स्थानिक पातळीवर पोलीस कर्मचार्‍यांना सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांकडे येणारा माणूस हा त्रासात असतो तेव्हाच येतो़ त्यामुळे पोलिसांची त्या माणसाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे आवश्यक आहे़ ड्रोन कॅमेर्‍यांची लवकरच खरेदी करण्यात येणार आहे़ ड्रोनबाबत केंद्र सरकार लवकरच आचारसंहिता आणणार आहे, अशी माहितीही लक्ष्मीनारायण यांनी दिली.


Web Title: Nanded police to set up 200 houses; Additional Director General of Police gives information
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.