नांदेड महापालिकेच्या अभियंत्याला मारहाणीचे तीव्र पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:11 AM2018-02-18T00:11:45+5:302018-02-18T00:11:55+5:30

महापालिकेच्या वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयाचे कंत्राटी कनिष्ठ अभियंता संदीप पाटील यांना झालेल्या मारहाणीचे शनिवारी तीव्र पडसाद उमटले. पाटील यांना मारहाण करणा-या दिलीपसिंघ सोडी यांच्या पत्नी नगरसेविका गुरप्रितकौर सोडी यांना नगरसेवक पदावरुन अपात्र ठरवावे, असा ठरावही संमत करुन मारहाणीच्या निषेधार्थ शनिवारची सर्वसाधारण सभा तहकूब केली. दुसरीकडे महापालिका अधिकारी, कर्मचा-यांनीही दुपारपर्यंत कामबंद आंदोलन केले़

Nanded Municipal Engineering Engineer | नांदेड महापालिकेच्या अभियंत्याला मारहाणीचे तीव्र पडसाद

नांदेड महापालिकेच्या अभियंत्याला मारहाणीचे तीव्र पडसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयाचे कंत्राटी कनिष्ठ अभियंता संदीप पाटील यांना झालेल्या मारहाणीचे शनिवारी तीव्र पडसाद उमटले. पाटील यांना मारहाण करणा-या दिलीपसिंघ सोडी यांच्या पत्नी नगरसेविका गुरप्रितकौर सोडी यांना नगरसेवक पदावरुन अपात्र ठरवावे, असा ठरावही संमत करुन मारहाणीच्या निषेधार्थ शनिवारची सर्वसाधारण सभा तहकूब केली. दुसरीकडे महापालिका अधिकारी, कर्मचा-यांनीही दुपारपर्यंत कामबंद आंदोलन केले़
शुक्रवारी रात्री मनपाचे कंत्राटी कनिष्ठ अभियंता संदीप पाटील यांना शनि मंदिर परिसरात दिलीपसिंघ सोडी व अन्य तिघांनी शिवीगाळ करुन मारहाण केली होती. या प्रकरणी इतवारा ठाण्यात रात्रीच गुन्हाही दाखल झाला़ महापालिका अधिकारी- कर्मचारी शनिवारी सकाळी १० वाजेपासून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाले. मारहाण करणाºया सोडी यांना अटक करा, अशी मागणी त्यांनी केली़ दुसरीकडे महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली. या सभेतही मारहाणीचा निषेध करण्यात आला. इतकेच नव्हे, तर काँग्रेसचे गटनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सदर प्रकरणात दिलीपसिंघ सोडी यांच्या पत्नी नगरसेविका गुरप्रितकौर सोडी यांना सदस्यत्वापासून अपात्र ठरवावे, असा ठराव सभागृहापुढे ठेवला. या ठरावास किशोर स्वामी, अब्दुल सत्तार यांनी अनुमोदन दिले. या प्रस्तावावर आनंद चव्हाण, किशोर स्वामी, अब्दुल सत्तार आदींनी चर्चा केली.
नगरसेविका गुरप्रितकौर सोडी यांनीही सभागृहात आपली बाजू मांडली. कनिष्ठ अभियंता पाटील यांना दिलीपसिंघ सोडी यांनी मारहाण केली नसल्याचे सांगताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तसे स्पष्ट दिसत आहे़ सभागृहात आपले म्हणणे मांडताना त्या भावूक झाल्या होत्या़ प्रभागातील अनेक समस्यांबाबत पाटील यांना वारंवार कळवूनही त्या सोडविल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी महापौर शीलाताई भवरे यांनीही निषेध केला. सभागृहाने केलेला ठराव त्वरित पाठविला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिकारी, कर्मचाºयांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देवून गुरप्रितकौर सोडी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. सोडी यांच्याकडून यापूर्वीही अधिकारी -कर्मचाºयांना मारहाण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले़ यावेळी उपायुक्त रत्नाकर वाघमारे, उपायुक्त संतोष कंदेवार, उपायुक्त संभाजी वाघमारे, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, गिरीष कदम, सहाय्यक आयुक्त प्रकाश येवले, सहाय्यक आयुक्त माधवी मारकड, अजितपालसिंघ संधू, विलास गजभारे, मिर्झा फरहतउल्ला बेग, शिक्षणाधिकारी डी.आर. बनसोडे, बी.बी. एंगडे, सुदाम थोरात, सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे, जमील अहेमद, संघरत्न सोनसळे आदी उपस्थित होते. आयुक्तांच्या सूचनेनंतर कर्मचाºयांनी दुपारनंतर कामकाजाला प्रारंभ केला़

आयुक्त म्हणाले, मी तुमच्या पाठीशी
आंदोलनकर्त्या अधिकारी, कर्मचा-यांनी आयुक्त देशमुख यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी आयुक्तांनी अधिकारी, कर्मचाºयांना आश्वस्त करताना मी आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. अधिकारी, कर्मचाºयांनी काम करताना नियमानुसार काम करणे आवश्यक आहे़ कुणालाही घाबरु नये, केवळ कायद्याला घाबरावे, असे सांगितले.

पद नाहीच, आहे त्या पदावरुनही काढण्याचा ठराव
महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी गुरप्रितकौर सोडी यांची निवड करावी, असे शिफारसपत्र भाजपाच्या महानगराध्यक्षांनी दिले आहे. ही निवड अद्याप झाली नाही. उलट शनिवारी झालेल्या सभेत गुरप्रितकौर सोडी यांचे नगरसेवक पदच रद्द करण्याचा ठराव सभागृहाने एकमुखाने संमत केला आहे.
मारहाण पतीची, कारवाई पत्नीवर
कंत्राटी कनिष्ठ अभियंता पाटील यांना दिलीपसिंघ सोडी मारहाण केल्यानंतर त्यांच्या पत्नी गुरप्रितकौर सोडी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव म्हणजे मारहाण पतीची आणि कारवाई पत्नीवर असाच प्रकार घडला आहे. पतीने केलेल्या चुकीप्रकरणी पत्नीविरुद्ध कारवाई कशी? असा प्रश्नही पुढे आला आहे. महापालिकेच्या सभागृहात मंजूर केलेला हा ठराव कितपत योग्य आहे? असा प्रश्नही आता पुढे आला आहे.

Web Title: Nanded Municipal Engineering Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.