नांदेड महानगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:23 AM2019-06-21T01:23:56+5:302019-06-21T01:24:59+5:30

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठे यश मिळाल्यानंतर पक्षाने आपले सर्व लक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकांवर केंद्रीत केले आहे. या अनुषंगानेच जिल्ह्यातील महत्वाचे पद असलेल्या शहर महानगराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षात कमालीची रस्सीखेच सुरू आहे.

Nanded Municipal Council | नांदेड महानगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

नांदेड महानगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

googlenewsNext
ठळक मुद्दे२२ रोजी निर्णय अपेक्षित भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठीही अनेकांची फिल्डींग

विशाल सोनटक्के।
नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठे यश मिळाल्यानंतर पक्षाने आपले सर्व लक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकांवर केंद्रीत केले आहे. या अनुषंगानेच जिल्ह्यातील महत्वाचे पद असलेल्या शहर महानगराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षात कमालीची रस्सीखेच सुरू आहे. २२ जून रोजी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे पार पडणार असून या बैठकीतच या दोन्ही नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाले असले तरी भाजपासमोर विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचे तगडे आव्हान असणार आहे. जिल्हा परिषदेसह महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. याबरोबरच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते ेअशोकराव चव्हाण यांनीही थेट जनसंपर्क वाढवित ग्रामीण भाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करीत प्रदेश भाजपानेही जिल्हा भाजपाला ताकद देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी साजरा होत असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेड येथे घेण्यात येते असलेले राज्यस्तरीय शिबीरही या रणनीतीचाच भाग असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण पोषक करण्याच्या हेतुनेच नांदेडमध्ये योग शिबिराची ही नांगरणी करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीतील विजयाचे सोहळे साजरे होत असतानाच अवघ्या एक महिन्यात जिल्हा भाजपात धुसपुस सुरू झाली आहे. आगामी काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता प्रमुख पदाधिकाºयातील ही रस्सीखेच येणाºया दिवसात वाढणार आहे. सध्या प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी फडकाविलेल्या बंडाच्या झेंड्यामुळे जिल्हा भाजपात सर्व काही अलबेल नसल्याचेच पुढे आले आहे. त्यातच शहर महानगराध्यक्ष पदासोबत ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीही पुढील काही दिवसात होणे अपेक्षित असल्याने भाजपातील गट-तट सक्रीय झाले आहे. त्यामुळेच भाजपा पक्षश्रेष्ठींना हस्तक्षेप करीत पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घ्याव्या लागणार आहेत. महानगराध्यक्ष पदाची मुदत संपल्याने संतुक हंबर्डे यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार राजीनामा सुपूर्द केला आहे. या पदासाठी आता दिलीप कंदकुर्ते, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह मिलिंद देशमुख यांचे नाव चर्चेत आहे. हंबर्डे हे शहरात पक्ष संघटन करण्यात अपयशी ठरल्याचा पक्षातील काहींचा आरोप असून महानगरपालिका निवडणुकीतील अपयशाकडे यासाठी बोट दाखविले जाते. दुसरीकडे शहरात तगडी बुथबांधणी केल्यानेच यंदाच्या लोकसभेत शहरातील मताचा टक्का वाढल्याचा दावा हंबर्डे समर्थकांकडून केला जात आहे. गुरुवारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हुकूमशाहीला बळी पडू नका, असे सांगत सह्यांची मोहीम राबविल्याचे समजते.
पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडून दिलीप कंदकुर्ते यांचे नाव पुढे केले जात आहे तर खा. प्रताप पाटील चिखलीकर यांची पसंती मिलिंद देशमुख यांच्या नावाला दिसते. या पार्श्वभूमीवर महानगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत उत्स्कुता आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा विषयही सध्या ऐरणीवर आहे. विद्यमान अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यापासून ग्रामीण भागाची सुत्रे नव्या नेतृत्वाकडे सोपवावीत, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या पदासाठी राजेश पवार, श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मणराव ठक्करवाड आदींची नावे चर्चेत आहेत.
निष्ठावंतांनीही घेतली स्पर्धेत उडी
निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातून उडी मारुन भाजपामध्ये आलेल्यांना पक्षाकडून मानाचे पान दिले जात असल्याची खदखद जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. पक्षात मागील २५ ते ३० वर्षापासून निष्ठेने काम करणा-यांनी केवळ सतरंज्याच उचलायच्या का? असा या कार्यकर्त्यांचा सवाल आहे.
किमान संघटनामध्ये तरी पक्षातील जुन्या कार्यकर्त्याना मानाचे स्थान देण्याच्या भावना व्यक्त होत आहेत. महानगराध्यक्ष पदासाठी प्रवीण साले, मोहनसिंग तौर तर ओबीसी अध्यक्ष नियुक्त करायचा असल्यास व्यंकटेश चाटे, जनार्धन ठाकूर (सिडको) आदींचाही विचार पक्षाने करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
विधानसभेचे इच्छुक होऊ शकतात स्पर्धेबाहेर
महानगराध्यक्ष पदासह ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठीही इच्छुक असलेल्या काहींना आमदारकीचेही वेध लागले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या तिकिटासाठी हे इच्छुक जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेतून ऐनवेळी बाहेर पडू शकतात. दुसरीकडे पक्षाकडूनही ज्यांना उमेदवारी द्यायची नाही अशांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घालून एक प्रकारे त्यांची बोळवण केली जाऊ शकते.
पूर्वी भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद हे तत्व पाळले जात होते. याबरोबरच प्राथमिक सदस्य म्हणून तीन वर्षे काम केल्यानंतर त्याला सक्रीय सदस्य म्हणून मान्यता मिळत होती. आणि त्यानंतरच तो पदासाठी पात्र ठरत होता. मात्र हा नियमही काटेकोरपणे पाळला जात नसल्याचे दिसते.

Web Title: Nanded Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.