नांदेड जिल्ह्यातील वाहनधारक हुशार ! स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी दररोज करतात सीमोल्लंघन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 05:28 PM2018-04-06T17:28:28+5:302018-04-06T17:32:08+5:30

सीमावर्ती भागातील देगलूर, बिलोली, धर्माबाद व किनवट या तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी तफावत असल्याने वाहनधारक सीमोल्लंघन करत आहेत़

Nanded district's drivers are clever! every day choose other states for cheap petrol and diesel | नांदेड जिल्ह्यातील वाहनधारक हुशार ! स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी दररोज करतात सीमोल्लंघन 

नांदेड जिल्ह्यातील वाहनधारक हुशार ! स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी दररोज करतात सीमोल्लंघन 

Next
ठळक मुद्दे पेट्रोल दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना  परराज्यातील पेट्रोलपंप आधारभूत ठरले आहेत़ एकीकडे पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना तेलंगणा, कर्नाटक प्रांतात मात्र तेलाचे भाव घसरत आहेत़

- श्रीधर दीक्षित /राजेश गंगमवार /गोकुळ भवरे/ लक्ष्मण तुरेराव 

नांदेड :  सीमावर्ती भागातील देगलूर, बिलोली, धर्माबाद व किनवट या तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी तफावत असल्याने वाहनधारक सीमोल्लंघन करत आहेत़  पेट्रोल दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना  परराज्यातील पेट्रोलपंप आधारभूत ठरले आहेत़  एकीकडे पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना तेलंगणा, कर्नाटक प्रांतात मात्र तेलाचे भाव घसरत आहेत़ त्यामुळे बचतीचा मार्ग स्वीकारून या तालुक्यातील वाहनधारक  हाकेच्या अंतरावर असलेल्या परप्रांतीय पंपावर जावून पेट्रोल भरताना दिसत आहेत.

तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या देगलूर तालुक्यातील पेट्रोल पंपावर तेलाचे दर वाढत असतानाच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील सीमावर्ती गावातील पेट्रोल पंपावर मात्र पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळत आहे़ देगलूर पासून २ कि़ मी़ अंतरावर असलेल्या तेलंगणातील मदनूर येथे पाच रूपयांनी पेट्रोल तर हानेगाव पासून १५ कि़ मी़ अंतरावर असलेल्या कर्नाटकातील औराद पंपावर  आठ रूपयांनी पेट्रोल स्वस्त आहे. देगलूर येथील पंपावर पेट्रोल ८३.२९, डिझेल ६९.३३, तेलंगणा मधील मदनूर येथे पेट्रोलचा प्रतिलिटर दर ७८.२७, डिझेलचा ७१.३३रुपये  तर कर्नाटकच्या बिदर येथे पेट्रोल ७५.८६ व डिझेल ६६.६६ रुपये असा आजचा दर आहे. प्रत्येक राज्याचा या इंधनावरील टॅक्स वेगवेगळा असल्याने तसेच पेट्रोल व डिझेल यांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला नसल्याने दरामध्ये तफावत असल्याचे दिसते. 

बिलोलीपासून आठ कि़ मी़ अंतरावर पेट्रोल  स्वस्त
शहरापासून आठ कि़मी़वर तेलंगणात असलेल्या पेट्रोलपंपावर पाच रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे़ परिणामी बिलोली शहरासह तालुक्यातील वाहनधारक त्या राज्यात पेट्रोलसाठी जात आहेत़ एकूणच दरवाढीमुळे या भागातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत़ बिलोलीकरांना ८ कि़मी़ अंतर असले तरी कार्ला, येसगी, बोळेगाव, गंजगावकरांना अवघ्या ४ कि़मी़ वर पाच रुपये लिटर मागे वाचतात़ तेलंगणा भागात सध्या पेट्रोलचे दर प्रति लिटर ७८़५० पैसे आहे़ 

किनवटच्या वाहनधारकांची पसंती आदिलाबाद
किनवट येथे ८३़२२ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल विक्री होत असताना सीमावर्ती तेलंगणातील आदिलाबाद येथे मात्र पेट्रोल ७९़८५ रुपये प्रतिलिटर भावाने  मिळत आहे़ केवळ ५० ते २५ कि़मी़ अंतरावर परप्रांतात ३़३७ पैसे लिटर मागे बचत होत असल्याने वाहनधारक तेलंगणात जाऊन पेट्रोल भरण्यास पसंती देत आहेत़  मराठवाड्यात पेट्रोलचे भाव वधारले असतानाच तेलंगणात मात्र तेलाचे भाव घसरल्याचे चित्र आहे़

धर्माबादकरांची बासरच्या पंपावर गर्दी 
धर्माबादेत ८४़३२ रूपये प्रतिलिटर पेट्रोल मिळत आहे़ तर तेलंगणा राज्यातील अवघ्या ७ कि़ मी़ अंतरावरील बासर गावाजवळील पंपावर ७९ प्रतिलिटर पेट्रोल विक्री होत आहे़ प्रत्येक लिटर मागे ५ रूपयांची बचत होत असल्याने वाहनधारक सर्रास तेलंगणात पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत़ 

इंधन दरातील तफावत
गाव पेट्रोल डीझेल 
किनवट ८३.२२६९.३८
आदिलाबाद ७९.८३७१.८१
बिलोली८३.३३७८.५०
तेलंगणा ६९.४८७२.४०
देगलूर ८३.२९६९.३३
मदनुर ७८.२७७१.३३
धर्माबाद ८४.३२७०.४१
बासर ७९.००

७४.००

 

Web Title: Nanded district's drivers are clever! every day choose other states for cheap petrol and diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.