नांदेड जिल्ह्यात ९ तालुक्यांतील गावांची तहान भागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:18 AM2018-05-11T00:18:55+5:302018-05-11T00:18:55+5:30

जिल्ह्यात हदगाव, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, नांदेड, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली या तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ही टंचाई दूर करण्यासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून २९ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे या तालुक्यांसाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात २४ दलघमी पाणी नव्याने आरक्षित करण्यात आले आहे.

Nanded district will suffer the thirst of 9 talukas | नांदेड जिल्ह्यात ९ तालुक्यांतील गावांची तहान भागणार

नांदेड जिल्ह्यात ९ तालुक्यांतील गावांची तहान भागणार

Next
ठळक मुद्दे२४ दलघमीच्या अतिरिक्त आरक्षणासह पाणी सोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात हदगाव, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, नांदेड, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली या तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ही टंचाई दूर करण्यासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून २९ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे या तालुक्यांसाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात २४ दलघमी पाणी नव्याने आरक्षित करण्यात आले आहे.
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प यंदा न भरल्यामुळे जिल्ह्याला पहिल्यांदाच सिंचनासाठी या प्रकल्पातून पाणी मिळाले नाही. त्यामुळे सदैव बागायती राहिलेल्या भागात यंदा मात्र पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात जिल्ह्यात यंदा पिण्याच्या पाण्यासाठी केवळ ३५ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. आतापर्यंत दोन टप्प्यात ३० दलघमी पाणी घेण्यात आले आहे. प्रकल्पात जिल्ह्यासाठीचे ५ दलघमी आरक्षण शिल्लक आहे.
मात्र हदगाव, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, नांदेड आणि उमरी तालुक्यांत आजघडीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात २४ दलघमी पाण्याचे नव्याने आरक्षण करण्यात आले. पूर्वीचे पाच आणि आता नव्याने आरक्षित केलेले चोवीस असे एकूण १९.२० दलघमी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले आहेत. हे पाणी कॅनॉल आणि एस्केपद्वारे सोडले जाणार आहे.
भाटेगाव एस्केप आणि भाटेगाव कालव्याद्वारे ७ दलघमी पाणी नांदेड व अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण भागासाठी मेंढला नाल्यामार्गे व आसना नदीपात्रात सोडले जाणार आहे. शनी व कोंढा या अर्धापूर तालुक्यातील गावांसाठी दाभढी नाला, कासारखेडा मार्गे व आसना नदीमार्गे पासदगाव बंधाºयापर्यंत पाणी येणार आहे. पार्डी एस्केपद्वारे अर्धापूर व नांदेड तालुक्यातील गावांसाठी २ दलघमी पाणी उपलब्ध होईल. चेनापूर व सोनाळा एस्केपद्वारे नांदेड, अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील, निळकंठ कालव्याद्वारे हदगाव तालुक्यातील सोनाळा, रोडगी, निळकंठवाडी, चाभरा, नाईकतांडा, चाभरा एस्केपद्वारे ग्रामीण भागासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. गोरठा एस्केपद्वारे उमरी, धर्माबाद, नायगाव आणि बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागासाठी व पुढे गोदावरी पात्रात बळेगाव बंधाºयापर्यंत दीड दलघमी पाणी सोडले जाणार आहे. वाघाळा एस्केपच्या माध्यमातून धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण भाग आणि गोदावरी पात्रात बाभळी बंधाºयापर्यंत दोन दलघमी पाणी सोडले जाणार आहे.

जिल्हाधिकारी घेणार आढावा बैठका
सद्यस्थितीत जिल्ह्याच्या विविध भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईसह इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी १५ ते २३ मे या कालावधीत जिल्हाधिकारी अरूण डोंगरे उपविभागनिहाय बैठका घेणार आहेत.१५ मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, भोकर येथे सकाळी १० वाजता तर दुपारी ४ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, हदगाव येथेही आढावा बैठक होणार आहे. १६ मे रोजी सकाळी १० वाजता मुखेड तहसील कार्यालयात, १७ मे रोजी सकाळी १० वाजता उपविभागीय नांदेडसाठी नियोजन भवनातील कॅबीनेट हॉलमध्ये तर याच दिवशी दुपारी ४ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, कंधार येथे बैठक होणार आहे. १८ मे रोजी सकाळी १० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, धर्माबाद तर दुपारी ४ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, बिलोली येथे बैठक होणार असून २२ मे रोजी सकाळी १० वाजता किनवट उपविभागीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पाणीटंचाई, पाणी पुरवठ्याबरोबरच जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, एमआरईजीएस सिंचन विहिरी आदींसह इतर योजना तसेच कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.

पैनगंगेचे पाणी बाभळी बंधाºयापर्यंत पोहोचणार
जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती पाहता उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात २४ दलघमी पाण्याचे आरक्षण मंजूर करत २९ दलघमी पाणी सोडण्यात येत आहे़ या पाण्यामुळे निम्म्या जिल्ह्याची तहान भागणार आहे़ जिल्हाधिकारी डोंगरे यांची अतिरीक्त २४ दलघमी पाणी मंजूर करण्यासाठी महत्वाची भूमिका ठरली़ तसेच माजी मुख्यमंत्री खा़अशोक चव्हाण व आ़अमिताताई चव्हाण यांचाही पाठपुरावा महत्वाचा ठरला़ उर्ध्व पैनगंगेचे पाणी सोडण्यात येत असल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दुर होणार आहे़

विष्णूपुरीतील पाणी चोरी रोखण्याची गरज
शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातून २५ दलघमी पाणी घेण्यात आले आहे. यातील किती पाणी विष्णूपुरी प्रकल्पापर्यंत पोहोचते यावरच शहरातील आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ तीन ते चार दलघमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी लोअर दुधना प्रकल्पातून बुधवारपासून पाणी घेण्यास प्रारंभ झाला. सुरुवातीला राहटी बंधाºयाद्वारे परभणी महापालिकेसाठी तर नांदेडसाठी पूर्णा येथील कोल्हापुरी बंधाºयामार्फत पाणी घेतले जाणार आहे.
लोअर दुधनातून नांदेडसाठी २५ दलघमी पाणी सोडण्यात येत असले तरी प्रत्यक्षात विष्णूपुरीपर्यंत १२ ते १५ दलघमी पाणी पोहोचेल अशी शक्यता पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केली. या पाण्याचे योग्य नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे. प्रशासनाने यापूर्वी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र आगामी मुस्लिम बांधवांचा सुरु होणारा पवित्र रमजान महिना पाहता सध्या सुरु आहे त्या प्रमाणेच पाणीपुरवठा ठेवावा, अशी सूचना केली. दुसरीकडे विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून पाण्यासाठी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात चोरी होते. हजारो पंपाच्या माध्यमातून पाणी उपसा केला जातो. हा उपसा रोखण्याचीही गरज निर्माण झाली आहे. यासाठी महसूलसह पोलीस, मनपा, विद्युत विभाग यांचे संयुक्त पथक स्थापन केल्यास पाणी चोरीस आळा बसू शकेल.

उगम ते संगम
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून सोडण्यात येणारे २९ दलघमी पाण्यापैकी हदगाव, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, नांदेड, उमरी या तालुक्यासह धर्माबाद, नायगाव आणि बिलोली तालुक्यातही पाणी पोहोचणार आहे. हे पाणी धर्माबाद तालुक्यासाठी बाभळी बंधाºयापर्यंत पाणी दिले जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यात झालेल्या उगम ते संगम या उपक्रमातंर्गत पैनगंगेचे पाणी थेट बाभळीपर्यंत पोहोचण्याची किमया साधली. यंदाही त्या कामाचा उपयोग होत आहे.

Web Title: Nanded district will suffer the thirst of 9 talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.